77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश

0
1

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2023

माझ्या प्रिय नागरिकांनो,

आपल्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्हाला सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! हा आपल्या सर्वांसाठी गौरवशाली आणि मंगलमय दिवस आहे. या प्रसंगी उत्सवी वातावरण निर्माण झालेलं पाहून मला खूप आनंद झाला आहे. आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतभरच्या गावांतल्या आणि शहरांतल्या बालकांचा, तरुणाईचा आणि वृद्धांचाही उत्साह आणि त्यांची तयारी बघणं हाच एक मोठ्या आनंदाचा तसंच अभिमानाचा विषय आहे ! आपली जनता अत्यंत उत्साहात ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा करत आली आहे.

स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा हा उत्साह बघून मला माझ्या बालपणचे दिवस आठवतात. आमच्या खेड्यातल्या शाळेत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्याचा उत्साह आमच्या अंगात मावत नसे. तिरंगा फडकताच आमच्यातून एक चैतन्यदायी ऊर्जा सळसळल्यासारखी वाटे. आमची हृदयं देशभक्ती आणि अभिमानाने भरून जात आणि आम्ही तिरंग्याला कडक सलाम ठोकून राष्ट्रगीत गात असू. मिठाई वाटली जाई आणि देशभक्तीपर गीतं गायली जात- नि त्या गीतांचे बोल आमच्या मनात अनेक दिवस दुमदुमत असत. माझं सद्भाग्य म्हणून, मी शाळेत शिक्षिका झाल्यावर ते दिवस पुन्हा जगण्याची संधी मला मिळाली.

आपण मोठे झाल्यावर कदाचित लहानपणसारखा आनंद व्यक्त करत नाही, पण मला खात्री आहे की आपले राष्ट्रीय सण साजरे करण्याची ऊर्मी आणि देशभक्तीची भावना आजही तसूभरही कमी झालेली नाही. स्वातंत्र्यदिन आपल्याला याचं स्मरण करून देतो की आपण म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर एका महान लोकसमुदायाचा भाग आहोत. अशा प्रकारच्या समुदायांपैकी हा सर्वात मोठा आणि सर्वश्रेष्ठ असा समुदाय आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या नागरिकांचा हा समुदाय आहे.

आपण एका श्रेष्ठ लोकशाहीचा भाग आहोत, ही गोष्टच आपण स्वातंत्र्यदिन सोहळ्यात साजरी करतो ! आपल्यापैकी प्रत्येकाची अनेक प्रकारची ओळख असते –आपली प्रत्येकाची  जात, संप्रदाय, भाषा आणि प्रदेश यांबरोबरच आपलं कुटुंब आणि व्यवसाय हीदेखील आपली ओळख असते हे खरं, पण या साऱ्यांपेक्षा श्रेष्ठ अशी एक ओळख असते, ती म्हणजे- ‘भारताचे नागरिक म्हणून मिळणारी ओळख ! आपल्यापैकी प्रत्येकजण समान नागरिक आहे; या भूमीवर प्रत्येकाला समान संधी; समान अधिकार आणि समान कर्तव्यं आहेत.

परंतु हे चित्र सदैव असंच नव्हतं. भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि प्राचीन काळापासून आपल्याकडे रुजलेल्या लोकशाही संस्था अगदी तळागाळापर्यंत कार्यरत होत्या . परंतु दीर्घकालीन वसाहतवादी राजवटीने त्यांचं अस्तित्व पुसून टाकलं होतं. १५ ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या देशात एक नवी पहाट उगवली. आपल्याला केवळ परकीय सत्तेपासूनच स्वातंत्र्य मिळालं असं नव्हे तर, आपला भाग्यलेख पुन्हा लिहिण्याचं स्वातंत्र्यही मिळालं.

अनेक ठिकाणच्या वसाहतींमधून परकीय सत्तांनी काढता पाय घेण्याचं युग आपल्या स्वातंत्र्यापासून सुरू झालं आणि वसाहतवादाचा अंत जवळ आला. आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाचं उद्दिष्ट सफल झालं हे तर महत्वाचं होतंच शिवाय लढ्याचं स्वरुपही उल्लेखनीय होतं. महात्मा गांधी तसंच दूरदृष्टी असणाऱ्या अनेक  असामान्य नेत्यांच्या मांदियाळीनं अद्वितीय अशा आदर्शांच्या चौकटीत आपल्या राष्ट्रीय आंदोलनाला आकार देण्याची धुरा पेलली. गांधीजींसह इतर नेत्यांनी भारताच्या आत्म्याला पुन्हा जागृत करून उच्च सांस्कृतिक मूल्यांचा पुन्हा एकदा शोध घेण्यासाठी देशाला प्रेरणा दिली. भारताच्या उज्ज्वल आदर्शाच्या वाटेवर चालत जगातल्या अनेक राजकीय संघर्षांनी, ‘सत्य आणि अहिंसा’ या आपल्या लढ्याच्या आधारभूत मूल्यांचं यशस्वी अनुसरण केलं.

अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच भारताला इतर देशांबरोबर उचित मानाचं स्थान पुन्हा प्राप्त झालं. आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या देशाच्या नागरिकांसमवेत मी त्यांना कृतज्ञ आदरांजली वाहते. मातंगिनी हाजरा आणि कनकलता बारूआ यांच्यासारख्या वीरांगनांनी भारतमातेसाठी प्राणांची आहुती दिली. सत्याग्रहाच्या अवघड वाटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना माता कस्तुरबा यांनी पदोपदी साथ दिली. सरोजिनी नायडू, अम्मू स्वामिनाथन, रमा देवी, अरुणा असफ अली आणि सुचेता कृपलानी अशा अनेक महान महिला विभूतींनी स्त्रियांच्या सर्व भावी पिढ्यांसाठी आत्मविश्वासाने देशसेवा आणि समाजसेवा करण्याचे प्रेरक आदर्श निर्माण केले. आज, विकासाच्या आणि देशसेवेच्या प्रत्येक क्षेत्रात महिला भरीव योगदान देत आहेत आणि देशाची मान उंचावत आहेत. काही दशकांपूर्वी कल्पनाही करता आली नसती अशा क्षेत्रांमध्येदेखील आज महिलांनी विशेष स्थान पटकावलं आहे.

आपल्या देशात स्रियांच्या आर्थिक सबलीकरणाकडे विशेष लक्ष पुरवलं जात असल्याचा मला आनंद वाटतो. आर्थिक सबलीकरणामुळे महिलांचं कुटुंबातलं आणि समाजातलं स्थान बळकट होतं. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचं आवाहन मी सर्व नागरिकांना करते आहे. आपल्या कन्याभगिनींनी धैर्याने आव्हानांवर मात करावी आणि आयुष्यात खूप पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनात ठरवलेल्या आदर्शांमध्ये महिला विकासाचाही पैलू समाविष्ट होता.

प्रिय नागरिकहो,

स्वातंत्र्यदिन म्हणजे आपल्याला आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडून घेण्याची संधी. तसंच आपल्या वर्तमानाचं मूल्यमापन करून भविष्याचा वेध घेण्याची सुद्धा ही योग्य वेळ. सद्यस्थितीत, भारतानं जागतिक व्यासपीठावर आपली उचित हक्काची जागा तर मिळवली आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपली प्रतिष्ठाही उंचावली आहे. अनिवासी भारतीयांशी होणाऱ्या भेटीगाठी आणि संवादांतून त्यांच्यात भारताप्रती एक नवा विश्वास आणि अभिमान जागृत झालेला मला दिसतो आहे. जगभर विकासाच्या आणि मानवहिताच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेषतः जी-20 च्या अध्यक्षतेसह आंतरराष्ट्रीय विचारमंचांची धुराही भारत समर्थपणे पेलत आहे.

जी-20  देश जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी  दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत  असल्याने, जगाच्या प्राधान्यक्रमाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने ही अद्वितीय संधी आहे. जी-20 अध्यक्षतेच्या माध्यमातून, व्यापार आणि वित्त क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्यायसुसंगत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.  व्यापार आणि वित्तापलिकडे जाऊन मानवी विकासाचे विषयही विचाराधीन आहेत. संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचे आणि कोणत्याही भौगोलिक सीमांपलिकडचे असे अनेक जागतिक मुद्दे आहेत. जागतिक प्रश्न हाताळण्याच्या बाबतीत भारताच्या नेतृत्वाचं मोल सिद्ध झाल्यामुळे, याही मुद्द्यांवर सदस्य राष्ट्रं प्रभावी कारवाई करू शकतील याची मला खात्री वाटते.

जी-20  अध्यक्षतेच्या बाबतीत एक नवीन पैलू असा आहे की,  मुत्सद्देगिरीशी संबंधित विषय थेट लोकांशी जोडले जात आहेत.  जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एक अभूतपूर्व अभियान चालवलं जात आहे. उदाहरणार्थ, शाळा-महाविद्यालयांमध्ये जी-20 च्या संकल्पनांवर आधारित स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी होताना दिसले की किती आनंद होतो! जी-20 शी संबंधित कार्यक्रमांचा उत्साह सर्वच नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

प्रिय देशवासियांनो,

सक्षमतेच्या जाणिवेसह हा उत्साह येणं शक्य झालंय, ते सर्व आघाड्यांवर देशाची दमदार वाटचाल सुरू असल्यामुळेच. समस्यांनी ग्रासून टाकलेल्या अस्थिर काळातही टिकाव धरू शकत असल्याचं भारतीय अर्थव्यवस्थेनं सिद्ध केलं आहेच, शिवाय इतरांसाठी आशेचा स्रोतही बनली आहे. जगातल्या बहुतांश अर्थव्यवस्थांची परिस्थिती नाजूक झाली आहे. जागतिक महामारीमुळे कोसळलेल्या आर्थिक संकटातून जागतिक समुदाय पुरता सावरण्याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडींमुळे अनिश्चिततेचं सावट आणखी गडद झालं आहे. तथापि, अवघड परिस्थितीशी सरकार चांगल्या पद्धतीने दोन हात करू शकलं आहे. देशानं संकटांचं रूपांतर संधींत केलं आहे आणि जीडीपीमध्ये प्रभावीपणे वाढही केली आहे. आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी आर्थिक वृद्धीमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. देश त्यांचा ऋणी आहे.

जागतिक पातळीवर चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन हे काळजीचं कारण झालं आहे, परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकार आणि रिजर्व बँक यांना यश आलं आहे. सरकारने जनसामान्यांना चलनवाढीची झळ बसू दिली नाही आणि त्याबरोबरच गरिबांना व्यापक सुरक्षाकवचही प्रदान केलं आहे. जागतिक आर्थिक विकासासाठी जग भारताकडे अपेक्षेनं बघत आहे. भारत आज जगातली पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे. जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे झेपावत आहे. आपल्या आर्थिक प्रगतीच्या या वाटचालीत सर्वसमावेशक विकासावर भर आहे.

सातत्यपूर्ण आर्थिक विकासाचे दोन प्रमुख पैलू आहेत. एकीकडे, व्यवसायसुलभता आणून, रोजगाराच्या संधी निर्माण करून उद्यमशीलतेच्या संस्कृतीला चालना दिली जात आहे. तर दुसरीकडे गरजूंच्या मदतीसाठी विविध क्षेत्रांत उपाययोजना  केल्या  जात आहेत, व्यापक स्तरावर कल्याणकारी योजना चालवल्या जात आहेत. ‘वंचितांना प्राधान्य’ देणं हे आपल्या ध्येयधोरणांच्या आणि कृतीच्या केंद्रस्थानी असतं. परिणामी, गेल्या दशकात अनेक लोक गरिबीच्या जोखडातूनबाहेर पडू शकले आहेत . त्याचप्रमाणे आदिवासींची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना प्रगतीच्या प्रवासात सहभागी करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात आहेत. मी आदिवासी बंधुभगिनींना आवाहन करते की त्यांनी आपल्या परंपरा समृद्ध करत आधुनिकतेचीही कास धरावी.

आर्थिक विकासाबरोबरच मानवी विकासासंबंधीच्या मुद्द्यांनाही उच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं पाहून मला आनंद वाटतो. शिक्षण हे सामाजिक सक्षमीकरणाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे हे मला एक शिक्षिका या नात्यानंही पटतं. 2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. विविध स्तरांवरील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी झालेल्या संवादांमधून मला जाणवतंय की शिकण्याची प्रक्रिया अधिक लवचिक झाली आहे. प्राचीन मूल्यांची आधुनिक कौशल्यांशी सांगड घालू पाहणाऱ्या दूरदर्शी धोरणामुळे येत्या काही वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व बदल होतील आणि त्यातून देशात मोठं परिवर्तन घडून येईल. भारताच्या आर्थिक प्रगतीला देशवासीयांच्या आणि विशेषतः तरुणांच्या स्वप्नांनी खरी ऊर्जा मिळते. या तरुणाईसाठीच अमर्याद संधींची दालनं उघडली गेली आहेत. स्टार्ट अप पासून क्रीडाक्षेत्रापर्यंत आपल्या युवावर्गाने उत्कृष्टतेची नवनवी क्षितिजं गाठली आहेत.

आजच्या नवभारताच्या आकांक्षांची क्षितिजं असीम आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सातत्याने नवीन यशोशिखरं गाठत आहे आणि उत्कृष्टतेचे नवे मापदंड स्थापन करत आहे. यावर्षी इस्रोने चंद्रयान – तीन प्रक्षेपित केलं आणि त्यानं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.  नियोजित कार्यक्रमानुसार आता काही दिवसांतच त्याचा ‘विक्रम’ नावाचा लँडर आणि ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर चंद्रावर उतरेल. आपल्या सर्वांसाठीच तो अतिशय गौरवास्पद क्षण असेल आणि मीही त्याचीच वाट पाहते आहे. आपल्या भावी अंतराळ कार्यक्रमांसाठी ही चांद्रमोहीम ही फक्त एक पायरी आहे.. आपल्याला आणखी खूप पुढे जायचं आहे.

केवळ अंतराळ मोहिमांमध्येच नव्हे तर,  धरतीवरही आपले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या पाच वर्षांत 50 हजार कोटी खर्चून सरकार ‘अनुसंधान नॅशनलरिसर्च फाउंडेशन ‘ स्थापन करत आहे. आपल्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत आणि संशोधन संस्थांमध्ये संशोधन आणि विकासाची बीजं पेरून त्याची वृद्धी करण्यासाठी ही संस्था काम करेल.

प्रिय देशवासियांनो,

विज्ञान -तंत्रज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करणं इतकंच आपलं ध्येय नसून, आपल्यासाठी ती मानवी विकासाची साधनं आहेत. हवामानबदल या विषयावर पूर्ण जगातल्या वैज्ञानिक आणि धोरणकर्त्यांचं आणखी तत्परतेने लक्ष केंद्रित होण्याची गरज आहे. हवामानाबाबत तीव्र घटना नजीकच्या काळात खूप मोठ्या संख्येने घडल्या आहेत. देशाच्या काही भागांत अतिप्रचंड पूर आले. काही ठिकाणी अवर्षणाचा सामना करावा लागला. या साऱ्यामागचं एक प्रमुख कारण जागतिक तापमानवाढ हेही आहे असं लक्षात येत आहे. म्हणूनच पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणं अपरिहार्य आहे. या संदर्भात हे आवर्जून सांगितलं पाहिजे की नवीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात आपण अभूतपूर्व लक्ष्यं गाठली आहेत. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानाचं नेतृत्व भारताकडे आहे. आंतरराष्ट्रीय वचनबद्धतांच्या पूर्तीसाठी आपला देश पुढाकार घेऊन महत्वाची भूमिका बजावत आहे. जागतिक समुदायाला आपण LIFE म्हणजे लाइफस्टाइल फॉर एनवरॉनमेंट हा मंत्र दिला आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

हवामानातले तीव्र बदल आणि संबंधित घटनांचा सगळ्यांवरच परिणाम होतो. परंतु गरीब आणि वंचित वर्गाच्या लोकांवर त्याचा अधिक विपरीत  परिणाम होतो. शहरं आणि डोंगराळ भागांनी या बाबतीत अधिक सक्षम होण्याची गरज आहे.

मला सांगावसं वाटतं की लोभाची संस्कृती जगाला  निसर्गापासून दूर लोटते आणि आता आपल्याला ही जाणीव होत आहे की आपल्या मुळांकडे परतायला हवं.  आजही अनेक आदिवासी समुदाय निसर्गाच्या निकट सान्निध्यात आणि त्याच्याशी सौहार्द राखून जगतात. त्यांच्या जीवनमूल्यांतून आणि जीवनशैलीतून क्लायमेट ऍक्शन च्या क्षेत्रासाठी  अमूल्य शिकवण मिळते.

युगानुयुगांपासून आपलं अस्तित्व टिकवण्याचं रहस्य आदिवासी समुदाय एका शब्दात वर्णन करू शकतात – तो शब्द आहे सहानुभूती. आदिवासी समुदाय सृष्टीला माता मानतात आणि तिच्या सर्व अपत्यांप्रती म्हणजे वनस्पती आणि जीवजंतूंबद्दल त्यांना सहानुभूती वाटते. जगात कधीकधी सहानुभूतीचा अभाव दिसून येतो. मात्र इतिहास असं सांगतो की असा टप्पा फार कमी काळ येतो, कारण करुणा हाच आपला मूळ स्वभाव आहे. महिलांना सहानुभूतीचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजतं, आणि मानवता जेव्हा वाट चुकते तेव्हा महिलाच योग्य वाट दाखवू शकतात असा माझा अनुभव आहे.

आपल्या देशाने नव्या संकल्पांसह अमृतकाळात प्रवेश केला आहे आणि 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. चला, आपल्या संविधानाने सांगितलेल्या मूलभूत कर्तव्याची पूर्तता करण्याचा संकल्प करूया आणि व्यक्तिगत तसंच सामूहिक कार्यांच्या सर्व क्षेत्रांत उत्कर्षाकडे वाटचाल करण्याचा सतत प्रयत्न करूया, जेणेकरून आपला देश सतत उन्नती करत कर्तव्यपरायणता आणि यशस्वितेच्या नवनवीन शिखरांवर पोहोचू शकेल.

प्रिय नागरिकहो,

आपलं संविधान हा आपला मार्गदर्शक दस्तावेज आहे. त्याच्या उद्देशिकेत आपल्या स्वातंत्र्यसंग्रामातले उच्च आदर्श अंतर्भूत आहेत. या, आपल्या राष्ट्राची उभारणी करणाऱ्या थोरांची स्वप्नं साकारण्यासाठी सद्भावना आणि बंधुभाव जपून पुढे चालूया.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. विशेषतः आपल्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना, अंतर्गत सुरक्षा जपणाऱ्या सुरक्षादलांच्या जवानांना तसंच पोलिसांना, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अनिवासी भारतीय समुदायाच्या लोकांना – सर्वांना शुभेच्छा.

धन्यवाद !

जय हिंद

जय भारत