संतप्त शेतकर्‍यांनी स्थानिक आमदार अग्रवालांच्या कार्यालयापुढे केले ‘ठिय्या’ आंदोलन

0
20

गोंदिया, 28 ऑगस्ट– शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही रक्कम मिळाली नसल्याने व वारंवार जिल्हा पणन कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अधिकारी, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज सोमवार 28 ऑगस्ट रोजी थेट स्थानिक अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयापुढे ‘ठिय्या’ आंदोलन करत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींविरोधात घोषणा दिल्या.
गोंदिया तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव धान खरेदी संस्थेला शासकीय धान खरेदी करण्याची परवानगी जिल्हा पणन कार्यालयाने दिली. या केंद्रावर चुटियासह परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी जून महिन्यात उन्हाळी हंगामातील हजारो क्विंटल धान विक्री केले. विक्री केलेल्या धानाची रक्कम आठवडाभरात शेतकर्‍यांच्या बँक खत्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र अडीच महिने लोटूनही रक्कम जमा झाली नाही. चुटियाच्या संस्थेच्या गोदामात खरेदी केलेला धान उपलब्ध नसल्याने रक्कम थांबविण्यात आल्याचे सांगीतले जाते. जिल्हा प्रशासनाने नियमाने संस्थेवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र शेतकर्‍यांची चूक नसताना विनाकारण शेतकर्‍यांची अडवणूक केली जात असल्याचा प्रकार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणने आहे. श्रीराम अभिनव संस्थेत 16 हजार 500 क्विंटल धान उपलब्ध नाही. या केंद्रावर धान विक्री करणार्‍या शेकडो शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये अडवून ठेवण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे न्यायाची हाक दिली. मात्र त्याच्या कष्टाचा पैसा त्यांना मिळाला नाही. खरीपाची लागवड केली. मजूरी, ट्रॅक्टर भाडा, खते, बियाणे, किटकनाशके यांची रक्कम देणे असल्याने 28 जुलै रोजी काही शेतकर्‍यांनी जिल्हा पणन अधिकारी यांचे कक्ष गाठले. त्यांना रकमेसंदर्भात विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. दरम्यान लोधीटोला येथील संतप्त शेतकरी दीपक कंसरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यदिनापर्यंत रक्कम जमा न झाल्यास आत्मदहन करण्याचा पावित्रा शेतकर्‍यांनी घेतला होता. त्यावेळी स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी मध्यस्थी करीत 27 ऑगस्टपर्यंत रक्कम मिळवून देण्याची ग्वाही शेतकर्‍यांना दिली होती. या कालावधीत शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने आज सकाळी 11 वाजे चुटीया, तांडा, लोढीटोला, ढाकणी, मुर्र्ी, पिंडकेपार, नवेगाव, पांढराबोडी, सोनेगाव खुर्द, भागवत टोला, गंगाझरी आदी अनेक गावातील शेकडो शेतकर्‍यांनी आ. अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयावर धडक दिली. यावेळी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात तीव्र घोषणबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी रस्त्यावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र होते.