अर्जुनी मोर.:शासनाच्या वतीने मोठ्या थाटामाटतात १७ एप्रिल २०१७ ला तत्कालीन सामाजिक न्याय व गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ईळदा प्रा.आ.केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. तीन वर्षात २०१९ मध्ये करोडो रुपये खर्च करून इमारत नववधू सारखी सजली आता २० ते ३० किलोमीटरची पायपीट करावी लागणार नाही आता आपल्याच गावात व परिसरात आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधा उपलब्ध होतील या आशेवर असलेल्या आदिवासी गोरगरीब कुटुंबाचा हिरमोड झाला. गेल्या सहा वर्षापासून डौलाने उभी असलेली ईमारत पांढरा हत्तीच ठरली आहे. त्यातही जि.प.प्रशासनाने आदिवासी गोरगरीब कुटुंबाच्या या आनंदावर कुऱ्हाड मारून त्यांच्या स्वप्नंनांची राख रांगोळी करून जि. परिषदेच्या निधीचे हवे तसे वापर करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोशीवर कारवाई तर करावीच मात्र ३० सप्टेंबर पूर्वी या आरोग्य केंद्राचे लोकार्पण करा अन्यथा त्याच ठिकाणी २ ऑक्टोंबर गांधी जयंती पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिक जि.प.सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी ईळदा येथे पत्रपरिषदेतून दिला आहे.
राजोली – ईळदा हा परिसर अतिशय अतिसवेदनशील नक्षलग्रस्त परिसर आहे.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी दिली मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन आणि बांधकाम सुद्धा ताबडतोब झाले. बांधकाम झालेल्या इमारतीला विजेची सुविधा नसल्यामुळे वाट बघावी लागली. त्यानंतर विजेची सुविधा झाली मात्र लोकार्पण झाले नाही. लोकार्पनाची वेळ आली तेव्हा वीज उपकरणे ७० सिलिंग फॅन व इतर विजेवर चालणारे उपकरण चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परत लोकार्पन थांबले परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रात्री अपरात्री रुग्णांना घेऊन २० ते ३० किलोमीटरची पायपीट करावी लागते. एवढेच नव्हे तर गंभीर आजारी रुग्ण वाटतच मृत्युमुखी पडले जातात. या समस्येचा विचार करून अनेक वेळा नागरिकांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणासाठी प्रशासन लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांकडे मागण्या केल्या दुसऱ्यांदा पुन्हा संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी १७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. पुन्हा विजेच्या सुविधा बसवण्यात आल्या पुन्हा लोकार्पण थांबले पुन्हा विजेचे उपकरणं तोडफोड झाली आहेत.खिडक्यांच्या काचा तुटल्या इमारतीची केलेली रंगरंगोटी उडाली दरवाजे खिडक्या चोरीला गेले. आदिवासी समाजाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आज घडीला अखेरच्या घटका मोजत आहे. नववधू सारखी सजलेली इमारत लोकार्पना आधीच जीवनावस्थेत होण्याच्या मार्गावर आहे. शासकीय मालमत्तेचे अतिशय नुकसान झालेले आहे.आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून इलेक्ट्रिक दुरुस्ती ५ लक्ष विशेस आवश्यक इतर दुरुस्ती करताना ९ लक्ष असा १४ लाखांचा निधी पुन्हा मंजूर करण्यात आला आहे. प्रा.आ.केंद्राच्या वीज सुविधेवर आतापर्यंत ५० लाखांचा निधी खर्च करण्यात येत आहे ही इतिहासातील पहिली वेळ असेल. असेही ते यावेळी म्हणले. पत्रपरिषदेला प. स. सदस्य फुलचंद बागडेरिया, घनश्याम धामट ग्रा.प. सरपंच संगीता कळयाम प्रीतम रामटेके ई. प्रामुख्याने उपस्थित होते.
ईमारतीचे बांधकाम २०१९ ला पूर्ण झाले विजेच्या सुविधा लावल्यानंतर पहिल्यांदा चोरी झाल्याचा कांगावा करण्यात आला त्याची तक्रार पोलिसात दाखल केल्याचे जि.प. कडून सांगण्यात येते मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात आज (ता.०२ ) रोजी २०१९ ते २०२३ पर्यन्त चौकशी केली असता अशी कुठलीही तक्रार नोंदच नाही. या सर्व प्रकरणावरून ईळदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारत बांधकामात लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करून कुंपणानेच शेण खालल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. व पहिल्यांदा केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी तिसऱ्यांदा गोर गरिबांच्या निधीचा वापर करण्यात येतोय त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.