वाघिणीच्या हल्ल्यात महिला ठार, देसाईगंज वनपरिक्षेत्रातील घटना

0
2

गडचिरोली: शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. महानंदा दिनेश मोहूर्ले (५३, रा.फरी) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ला करणारी वाघीण टी १४ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.

मृत महिला सकाळी ९ वाजताच्या सुमारास फरी-झरी जंगल परिसराला लागून असलेल्या आपल्या शेतात गवत काढायला गेलेली होती. दरम्यान, झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करून जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. यावेळी जवळपास असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता वाघ जंगलात पळून गेला. मात्र, तोपर्यंत महानंदा मोहुर्ले यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. पिडीत कुटुंबाला तत्काळ नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी कळविले आहे. हा हल्ला टी १४ वाघिणीने केला असल्याची शक्यता देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी वर्तविली आहे.