रस्ता दुरुस्तीच्या मागणीला घेऊन कुडवा चौकात रास्ता रोको आंदोलन,वाहतूूक विस्कळीत

0
22

गोंदिया,दि.11-तालुक्यातील कुडवा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोंदिया कुडवा धापेवाडा-दासगाव मार्गावरील विशाल लाॅन ते आंबेडकर चौक दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्या खड्यात पाणी साचून डबके तयार झालेले आहे.या पाणी साचलेल्या डबक्यातून वाहनचालकांना वाहन काढतांना आपला जिव धोक्यात घालण्याची वेळ आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करुनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज सोमवारला(दि.11)कुड़वा येथील नागरिकांनी सर्वदलीय रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.विशेष म्हणजे सदर रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात प्रशासनाला पुर्वसुचना देत आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता.

तरीही प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने कुडवा ग्रामपंचायत व परिसरातील नागरिकांनी संतप्त होत सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको आंदोलनाला सुरवात केल्याने तिरोडा-गोंदिया व गोंदिया तिरोडा मार्गाकडे जाणार्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या रास्ता रोको आंदोलनात सरपंच बालकृष्ण पटले,जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पुजा अखिलेश सेठ,पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम,उपसरपंच कमल फर्दे,अखिलेश सेठ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केतन तुरकर, ग्राम पंचायत  सदस्य,बचत गट,भजन मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनत सहभागी झाले आहेत.आंदोलनामुळे वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे चित्र बघावयास मिळाले असून रामनगर पोलिसांनी आंदोलनस्थळी पोलिसांचा ताफा तैनात केला आहे.