बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रुग्णावरच औषध खरेदीचा भार, जननी सुरक्षेचा निधी मुरतो कुठे?

0
7

गोंदिया : सुरक्षित प्रसुती आणि गर्भवती मातांच्या सुरक्षेकरिता जननी सुरक्षा कार्यक्रम राबविला जात आहे. याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. यातून सुरक्षित प्रसुतीच्या दृष्टीने जे काही साहित्य आणि औषध लागेल, ते मोफत देण्यात येते. मात्र बाई गंगाबाई रुग्णालयात हे साहित्य रुग्णांनाच बाहेरून खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे या योजनेकरिता येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

गर्भवती मातांची प्रसुती आणि बाळ एक महिन्याचे होईपर्यंत माता आणि बालक यांच्या सुरक्षेकरिता कसलाही खर्च लागू नये, याकरिता शासनातर्फे माता-बालक सुरक्षेसाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. प्रसुती शस्त्रक्रिया आणि त्याकरिता लागणारे साहित्य शासनाकडून पुरविण्यात येते. गर्भवती महिलांना मोफत औषधे आणि आवश्यक चाचण्या मोफत करून दिल्या जातात. मात्र बाई गंगाबाई रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे कारण हे नित्याचेच झाले आहे. सिझेरिअन प्रसुतीकरिता येथे काही दलाल सक्रिय असून त्यांच्यामार्फत शस्त्रक्रियेकरिता दोन हजार रुपये घेतले जातात. औषधदेखील बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

रक्ताचा तुटवडा कायमचाच

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रक्ताचा तुटवडा नेहमीचाच झाला आहे. गर्भवती मातांना प्रसुतीदरम्यान रक्ताचा पुरवठा निःशुल्क आणि विनापरतावा तत्वावर करण्याचा नियम आहे. मात्र येथे रिप्लेसमेंटशिवाय रक्त दिले जात नाही. त्यासाठीदेखील पैसे मोजावे लागतात. परिणामी रुग्णाचे नातेवाईक बाहेरील रक्तपेढ्यांमधून एका पिशवीकरिता अठराशे ते दोन हजार रुपये मोजून रक्त आणतात.

दलाल यंत्रणा सक्रिय

येथे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणण्याचा सल्ला दिला जातो. ती औषधे रुग्णाला तातडीने देण्याची गरज आहे, असे सांगितले जाते. त्याकरिता एका चिठ्ठीवर (कागदाच्या तुकड्यावर) औषधाचे नाव लिहून दिले जाते. अगदी रुग्णालयाच्या दाराबाहेरच काही दलाल सावजाची वाट बघत असतात. ती औषधे स्वतः आणून देणार असल्याचे सांगून चिठ्ठी घेतात. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयाच्या आवारात सर्रास सुरू आहे.