क्षयरोग नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
9

. क्षयरोग दुरीकरण बाबत आढावा सभा

    गोंदिया, दि.13 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण निश्चित केले आहे. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्ण केंद्रीत सेवा व क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्ह्यातील जनतेचा लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केले.

        12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी फोरम बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

      जिल्हाधिकारी श्री. गोतमारे पुढे म्हणाले, दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला हा क्षयरोग असु शकतो, त्यामुळे क्षयरोगाचे लवकर निदान करुन उपचार होणे आवश्यक आहे. क्षयरोग दुरीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजचे आहे. त्यामुळे आशा सेविकांना याबाबत प्रेरीत करण्यात यावे. स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये सहभाग घेण्यात यावा. क्षयरुग्णास उपचारासोबत पोषक आहाराची आवश्यकता असते. यासाठी दानशूर व्यक्तींनी निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किट देऊन जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले.

       एचआयव्ही बाधित व्यक्ती, मधुमेह व्यक्ती, वृध्द व्यक्ती, कुपोषित व्यक्ती, फुप्फुसाची इतर विकार असलेली व्यक्ती (सिलीकोसीस, दमा अस्थमा), स्टेराईड घेणारी व्यक्ती, मुत्रपिंडाचे रोग असलेली व्यक्ती, क्षयरोगाच्या संपर्कातील व्यक्ती, दिर्घकाळ धुम्रपान करणारे व्यक्ती यांच्यामध्ये एका दिवसाचा खोकला असला तरी क्षयरोग होवू शकतो. वजनात घट होणे, रात्री घाम येणे, थुंकीत रक्त पडणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे अशी लक्षणे असल्यास त्या रुग्णास संशयीत क्षयरोगी समजावे आणि जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत मोफत थुंकी तपासणी करुन घ्यावी. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी सांगितले.

       यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी पावरपॉईंट सादरीकरणाद्वारे क्षयरुग्णांबाबत जिल्ह्याची विस्तृत माहिती विशद केली.  प्रत्येक क्षयरुग्णाला उपचार पूर्ण होईपर्यंत प्रतिमहा 500 रुपये अनुदान पोषक आहाराकरीता रुग्णांच्या बँक खात्यात जमा केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

      यावेळी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबाबत जनजागृतीपर पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

      मागील तीन वर्षापासून सन 2020 ते 2022 पर्यंत जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून काढले व त्यांचा योग्य तो उपचार करुन निक्षय पोर्टलवर माहिती अद्ययावत केली त्याचबरोबर संशयीत क्षयरुग्णांना मोफत निदान करुन उपचार दिले आणि निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना दत्तक घेतले त्याबद्दल खाजगी वैद्यकीय व्यवसायीक क्ष-किरण विशेषतज्ञ डॉ.घनश्याम तुरकर, प्रयोगशाळा विशेषतज्ञ डॉ.संजय माहुले, जनरल फिजिसियन डॉ.संजय अग्रवाल, डॉ.देवाशिष चॅटर्जी, डॉ.अमित जायसवाल, डॉ.विकास डोये यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

        सभेला जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ.डी.एच.चांदेवार, जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे व दृष्टी स्वयंसेवी संस्था गोंदिया सरिता चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्षयरोग निर्मूलन करण्याकरिता समाजाची जनजागृती करून त्या आजाराबद्दल असलेला गैरसमज दूर करावा. क्षयरुग्णाला कलंकित न समजता त्याला सन्मानाची वागणूक मिळायला हवी. निक्षय मित्र चा रूपाने त्याचा आहाराची काळजी घेतल्यास त्याला ह्या जीवघेण्या आजारापासून मुक्त करण्यास हातभार लावावी हीच अपेक्षा…

– जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे

क्षयरोगापासून मुक्त झालेल्या दोन व्यक्तींची प्रतिक्रिया…

क्षय रोगापासून मुक्त झालेल्या दोन व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नियमीत उपचार केल्यास क्षयरोग हमखास बरा होतो असे सांगून सभेमध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे आभार मानले तसेच क्षयरोगापासून मुक्त होण्याकरिता आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा केले.