गोंदिया : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजातून तीव्र रोष व्यक्त होत आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचेच पडसाद आता गणेशोत्सवातही उमटू लागले आहे.
गोंदियातील आदर्श कॉलोनी येथील रहिवासी प्राची प्रमोद गुडधे यांनी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणरायाला ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कर, असे साकडे घातले. यासाठी त्यांनी साकारलेला आकर्षक देखावा लक्षवेधक ठरत आहे.इतर काही निर्माण करण्यापेक्षा ओबीसींच्या मुद्यावर देखावा तयार करण्याची संकल्पना सुचली आणि ती त्यांनी साकारसुद्धा केली. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जातीनिहाय जनगणना, ओबीसींचे वसतिगृह, ओबीसींच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवावी तसेच पोलीस पाटील भरतीत ओबीसी समाजावर झालेला अन्याय, अशा विविध मागण्यांकडे देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधले आहे.