देवरी,दि.23- विदर्भात आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून चर्चेत असलेले देवरी तालुक्यातील मुंडीपार येथील झाडीपट्टीरत्न निखिल बन्सोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यापीठ स्तरीय पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग दरवर्षी रा.से.यो.चे उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवकांना हा पुरस्कार देत असते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच समाजसेवेची वृत्ती जडावी व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणिव निर्माण करुन त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे दि २५ सप्टेंबर ला . राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी , रासेयो विभागाचे संचालक डॉ.सोपान पिसे व गणमान्य व्यक्तिंच्या उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.
निखिल बन्सोड हे विद्यार्थी जीवना बरोबरच प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरत आहेत. रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, संत महापुरुषांचे विचार समाजात पोहचवण्याचे काम करत आहेत व आदर्श समाज घडविण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या कामांची दखल घेत आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. निखिल बन्सोड यांनी आतापर्यंत रासेयोच्या ६ शिबिरात मोलाची भुमिका बजावली.
या यशाचे श्रेय निखिल यांनी न.मा.द. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .शारदा महाजन, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ बबन मेश्राम, बाबुराव मडावी विद्यालय देवरी, मनोहर भाई पटेल कला व कनिष्ठ महाविद्यालय देवरी आईवडील, गुरु, शिक्षक, मित्रमंडळी व रासेयो परिवाराला दिला आहे.