जननी सुरक्षेच्या लाभार्थ्यांचे खाते उघडा- डॉ.विजय सूर्यवंशी

0
11

गोंदिया,दि.१८ : जननी सुरक्षा योजनेचा आर्थिक लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळाला पाहिजे, यासाठी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १६ मे रोजी जिल्हास्तरीय कार्यप्रणाली समितीच्या सभेत जननी सुरक्षा योजनेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, प्रत्येक लाभार्थ्याचे आधारकार्ड उपलब्ध असले पाहिजे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करता येईल. यापुढे आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होणार असल्यामुळे बँकेत लाभार्थ्याचे खाते असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी लाभार्थ्यांची खाते शुन्य ठेवीवर उघडावीत. शेवटच्या घटकांपर्यंत आशा कार्यकर्त्या प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, आशा कार्यकर्तीचे मानधन त्यांना वेळेवर मिळाले पाहिजे.
डॉ.पुलकुंडवार यावेळी म्हणाले, बालकांच्या लसीकरणाचे काम शंभर टक्के झाले पाहिजे. वेगवेगळ्या आरोग्यविषयक सेवा लाभार्थ्यांना व रुणांना वेळेवर देण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य संस्थांमध्ये असलेल्या जनरेटरर्सचा वापर नियमित केला पाहिजे. याबाबतच्या कुठल्याही तक्रारी राहणार नाही याची खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले. सभेला जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा व्यवस्थापक तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत यांनी मानले.