मानद पशुकल्याण अधिकारी पदासाठी २५ मे पर्यंत अर्ज मागविले

0
46

गोंदिया,दि.१८ : प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० राज्यात लागू असून राज्य शासनाने ४ मार्च २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी रक्षक कायदा १९७६ या कायदयामध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र प्राणी रक्षक कायदा १९९५ लागू केला आहे. या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे. तथापि काही भागात या कायदयाची अजूनही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्राणी कल्याणाचे काम करणाऱ्या काही व्यक्तींना महाराष्ट्र कायदे सनियंत्रण समिती मुंबई यांचेकडून मानद पशुकल्याण अधिकारी या पदांवर नियुक्ती दिली आहे. राज्यात प्रत्येक भागात असे अधिकारी असावेत अशी पशुसंवर्धन विभागाची भूमिका आहे. सद्यस्थितीत अशा मानद पशुकल्याण अधिकाऱ्यांची संख्या खुपच कमी व अपुरी असल्याने यासाठी त्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून इच्छुक व्यक्तींना आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्राणी कल्याण कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या क्षेत्रात प्राणी कल्याणाचे काम करणाऱ्या व्यक्तींची मानद पशुकल्याण अधिकारी नियुक्ती करण्यासाठी इच्छुक व्यक्तींकडून २५ मे पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक व्यक्तींनी विहीत नमून्यातील अर्ज व दोन पासपोर्ट फोटो जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांचे कार्यालयात २५ मे २०१६ पूर्वी सादर करावे. असे आवाहन जि.प.चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चव्हाण यांनी केले आहे.