अन्यथा होईल कार्यवाही
गोंदिया, दि.23 : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालया मार्फत 13 जुलै 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व गुणवत्ता निरीक्षक यांना रासायनिक खतासोबत इतर खते लिंकींग बाबत कृषि केंद्र व गोडावून तपासणीचे आदेशित केलेले होते. त्यानुसार 14 जुलै ते 17 जुलै 2023 पर्यंत जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथकांमार्फत रेल्वे रँक पॉईंट गोंदिया तसेच घाऊक व किरकोळ खत विक्री केंद्र तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान सागरीका गोल्ड, मायक्रोला, सल्फा मेन्स, झिंक अशा पुरक खतांना भरारी पथकामार्फत विक्री बंद आदेश दिले आहे.
18 जुलै 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ खत विक्रेते व खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी यांची सभा सभापती (कृषि) जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करुन सदर सभेमध्ये खत उत्पादक कंपनी व कृषि केंद्र धारकांना लिंकींग करुन खते विक्री करु नये असे आदेश देण्यात आले असून लिंकींग करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे सूचित करण्यात आले.
कृभको कंपनीने रासायनिक खतासोबत मागणी नसतांना झिंक या खताचे पुरवठा केल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर कंपनीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे कार्यवाही करण्याकरीता पाठविण्यात आले. किसान कृषि केंद्र गोंदिया यांचे तक्रार अर्ज जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले असता त्याअनुषंगाने आर.सी.एफ. कंपनी यांना लिंकींग न करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कळविले आहे.