स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी पार पडली कार्यशाळा  

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सेवा व सुरक्षा शिबीर तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

चंद्रपूर २५ सप्टेंबर –  सफाई करणारे कर्मचारी हे सार्वजनीक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य करतात, इतके महत्वाचे काम करीत असतांना त्यांचे स्वतःच्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष होते. ज्याप्रमाणे घरात कर्त्या व्यक्तीचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे स्वच्छता योद्धे असलेले स्वच्छता कर्मचारी यांचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्वच्छता कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले.
स्वच्छ भारत दिवसाची पूर्वतयारी म्हणून, वार्षिक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा स्वच्छ भारत मिशन-शहरी आणि ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. भारतीय स्वच्छता लीग २.०, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे आणि सामूहिक स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांद्वारे देशभरातील नागरिकांचा सहभाग एकत्रित करणे हा या पंधरवड्याचा उद्देश आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता कार्यशाळा मनपा सभागृहात २५ सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेत स्वच्छतेसंबंधी महत्व तसेच स्वच्छतेचे कार्य करतांना कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती कोणती सावधगिरी बाळगावी,त्यांच्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत,त्यांचा लाभ कसा घेता येईल, भविष्य निर्वाह निधी काय आहेत,स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बाजुने कोणते कायदे आहेत,स्वच्छतेसंबंधी काय आधुनिक शिक्षण घेता येते व त्याद्वारे काय रोजगार निर्मिती होते यासंबंधीचे मार्गदर्शन सफाईमित्रांना करण्यात आले.
मनपा आरोग्य विभागामार्फत लसीकरण हे आरोग्याचे कवच असल्याने कामगार यांच्या मुलांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे पावर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे  सांगण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या नेतृत्वात डॉ.अश्विनी भारत, डॉ. अर्वा लाहेरी,डॉ.स्नेहल पोफळी,डॉ. योगेश्वरी गाडगे यांनी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यात सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या,मधुमेह,रक्तदाब,नाक,कान,
घसा,डोळे या तपासण्या करण्यात आल्या तसेच तपासणी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य माहिती ऑनलाईन सुरक्षित राहावी याकरीता त्यांचे आभा कार्ड सुद्धा काढण्यात आले. .
कार्यशाळेस आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले,EPFO ( कर्मचारी भविष्य निधी संघटन ) चे सहायक आयुक्त मिलिंद देऊळकर, ESIC कर्मचारी राज्य विमा संघटनतर्फे मार्गदर्शक गजानन तितरमारे व पी. पी. नागदेवे, केम फाउंडेशन,पुणे येथील प्रसन्न येवलकर,ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट नागपुरचे प्रादेशिक संचालक जयंत पाठक यांनी याप्रसंगी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस डॉ. अमोल शेळके,डॉ. वनिता गर्गेलवार,मनपाचे सर्व स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.