देवरी- तालुक्यातील कन्हाळगाव या मुख्य मार्गावरून असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी थोडाफार पाऊस पडला की पुलाला पूर येतो. यामुळे प्रवाश्यांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.
तीन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे पुन्हा पूर आला. मात्र, या संदर्भात एकही जनप्रतिनिधी तसेच प्रशासन लक्ष देत नसल्याने केव्हाही एखादी अप्रिय घटना घडू शकते. संबंधित विभागाने पुलाचे बांधकाम करून उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली येथील रहिवाशांकडून केली जात आहे. उल्लेखनीय असे की, पूरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
देवरी तालुक्यातील कन्हाळगाव मुख्य रस्ता देवरी शहराला जोडण्यात आला असून, या मुख्य रस्त्यावर कन्हाळगाव, बोवाटोला, जुगरूटोला, सिरजारटोला, मुरमाडीटोला, मंगेझरी असे अनेक छोटे छोटे खेडेगाव जोडले आहेत. या रस्त्यावरून अनेक नागरिक तसेच विद्यार्थी ये जा करीत असतात. या मुख्य रस्त्यावर लहान लहान नाले वाहत असून, या नाल्यांवर पुल बांधलेले आहेत. उन्हाळा तसेच हिवाळ्यात कन्हाळगाव मुख्य मार्ग आवागमनासाठी, काहीही अडचणी येत नाही. परंतु, पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून प्रवास करणे खूप धोकादायक असते. या रस्त्यावरून येताना पुराच्या पाण्यातून मार्ग शोधावा लागत असतो. विद्यार्थ्यांना त्यांचे पालकवर्ग पुराच्या पाण्यातून मार्ग काढून होणारे शैक्षणिक नुकसान टाळत असतात. अशा पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना जर एखाद्या वेळी धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी क्षेत्रातील जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभाग घेईल का?. असा सवाल नागरिकांमध्ये उत्पन्न झालेला आहे.
कन्हाळगाव नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रशासनाला तसेच जनप्रतिनिधीला वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, मागणीची दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन खा. महादेवराव शिवनकर यांच्या काळापासून या पुलाची उंची वाढविण्यासाठी कित्येक आमदार, खासदारांना निवेदन देण्यात आले. मात्र आतापर्यंत या पुलाची उंची वाढविण्यात आली नाही. तसेच दुरुस्तीही करण्यात आली नाही. -राजेंद्र बिसेन, सरपंच, कन्हाळगाव