आता गोवारी समाजबांधवांना मिळणार मोदी आवास योजनेचा लाभ

0
12

प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा : शासनाने काढला जीआर : घरकुलाचे स्वप्न साकारणार

गोंदिया : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने २८ जुलै २०२३ ला शासन निर्णय निर्गमित करून राज्यात इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास मंजुरी दिली होती; पण यात गोवारी समाजाचा समावेश केला नव्हता. त्यामुळे हे समाजबांधव या योजनेपासून वंचित होते. याची खा. प्रफुल्ल पटेल यांनी दखल घेत विदर्भातील गोवारी समाजबांधवांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने या योजनेत गोवारी समाजाचा समावेश केला. यासंबंधीचा जीआर बुधवारी (दि.२७) काढला आहे.

राज्यात आदिवासींसाठी शबरी आवास व आदिम आवास योजना अनुसूचित जाती, जमाती, रमाई आवास योजना, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशंवतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना अशा विविध योजनाच्या माध्यमातून त्या त्या प्रवर्गातील नागरिकांना लाभ दिला जातो; परंतु विदर्भात मोठ्या प्रमाणावर असलेल्या गोवारी समाजाला कोणत्याही योजनेच्या माध्यमातून आजवर घरकुलाचा लाभ दिला जात नाही. गोवासी समाज अत्यंत गरीब असून गुरे चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे सदैव त्यांची परिस्थिती हलाखीची असते. शासनाने त्यांच्या जातीचा एसबीसीमध्ये समावेश केल्याने मोदी आवास योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे मोदी घरकुल योजनेत एसबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या गोवारी समाजाला समाविष्ट करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता, तसेच यासंबंधाने सातत्याने पत्रव्यवहार केला. त्याचेच फलित झाले असून, बुधवारी राज्य सरकारने यासंदर्भातील जीआर काढीत गोवारी समाजाचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करीत मोदी आवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरविले आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर गोवारी समाजबांधवांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. गोवारी समाजबांधवांनी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचे आभार मानले आहेत.

………………………
विदर्भातील हजारो गोवारी समाजबांधवांना होणार लाभ

विदर्भात गोवारी समाजबांधव मोठ्या संख्येने आहे; पण त्यांना कुठल्याच घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांना जीवन जगावे लागत आहे. मात्र, आता त्यांचा मोदी आवास योजनेत समावेश झाल्याने दिलासा मिळाला आहे.
…………………………

विदर्भातील गोवारी समाजबांधव शासनाच्या विविध योजनांपासून मागील अनेक वर्षांपासून वंचित आहे. त्यांना कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नव्हता. मात्र, आता त्यांना मोदी आवास योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांची अडचण दूर होणार आहे.
प्रफुल्ल पटेल, खासदार