अध्यक्षाच्या आश्वासनानंतर जि. प. सदस्यांचे उपोषण तूर्तास मागे

0
27

= चार महिन्यानंतर होणार ईळदा आरोग्यवर्धनीचे उद्घाटन =
अर्जुनी मोर. :-गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तथा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या ईळदा आरोग्यवर्धनीचे उद्घाटन चार महिन्यानंतर होणार अशी ग्वाही गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी 30 सप्टेंबरला आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन दिल्याने अखेर केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी २ ऑक्टोबरला घोषित केलेले उपोषण तूर्तास थांबविले आहे.
सदर इमारतीमधील संपूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग संपूर्णतः तोडफोड करण्यात आली. कंत्राटदाराच्या सांगण्यावरून सदर इमारतींना शंभर चे जवळपास सिलिंग पंखे लावण्यात आले असून पाणीपुरवठ्याची संपूर्ण कामे सुद्धा करण्यात आली होती .मात्र ही इमारत हस्तांतरित झाली नसल्याने या इमारतीमधील संपूर्ण सामानाची तोडफोड करण्यात येऊन लाखो रुपयांचे सामान चोरीला गेले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर सदर इमारतीला शंभर पैकी एकही पंखा शिल्लक नसल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले .इमारतीचे बहुतांशी तावदाने( काच )सुध्दा फोडण्यात आले असून शौचालय व बाथरूमची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. या इमारतीचे त्वरित लोकार्पण करण्यात न आल्याने आरोग्यवर्धिनी केंद्र सुरूच करण्यात आले नसल्याने या परिसरातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. ही आरोग्यवर्धिनी त्वरित सुरू करावी या मागणीला घेऊन एक महिन्यापूर्वी केसोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे व परिसरातील नागरिकांनी 2 ऑक्टोंबर गांधी जयंती पासून आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले ,उपाध्यक्ष यशवंत गणवीर ,जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी; तालुका वैद्यकीय अधिकारी, भाजपाचे जेष्ठ नेते डॉक्टर गजानन डोंगरवार ,माजी पंचायत समिती सदस्य सदस्य रामलाल मुंगनकर व सर्व संबंधित कंत्राटदार संपूर्ण यंत्रणेसह ईळदा आरोग्यवर्धिनी येथे आले.प्रत्यक्षात पाहणी केली असता इमारतीच्या आत मधील परिस्थिती चिंताजनक दिसली. अशातच परिसरातील शेकडो नागरिकही एकत्र आले होते. त्या सर्व समक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी हे ईडदा आरोग्यवर्धनीच्या सामानाची प्रचंड तोडफोड झाल्याने नव्याने इलेक्ट्रिक फिटिंग व पाणीपुरवठा तसेच खिडक्यांची काचे लावावे लागतील त्यासाठी चार महिन्याचा कालावधी द्या हे आरोग्यवर्धिनी आम्ही सुरू करू असे ठोस आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन थांबविण्यात आले आहे .