जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या “आयुष्यमान भव ” अभियान अंतर्गत आरोग्य संस्थाना भेटी

0
6

गोंदिया-समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तसेच आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. वैद्यकिय महाविद्यालय, ग्रामिण रुग्णालय, आरोग्य वर्धिनी केंद्र व उपकेंद्रातुन लोकांना लोकोपयोगी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, स्वच्छ भारत अभियान, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहिम, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी, वय वर्ष 18 वरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी त्यात “निरोगी आरोग्य तरुणाईचे ,वैभव महाराष्ट्राचे ” अभियान अशा विविध उपक्रम चार महिन्यात गुणवत्तापुर्वक राबविण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांनी सर्व आरोग्य संस्थाना दिले आहे.
दि. 30 सप्टेंबर रोजी साप्ताहीक आरोग्य मेळावे घेण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत संसर्ग आजार जसे क्षयरोग, कुष्ठरोग ई. बाबत तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा देण्यात आली.तसेच आभा कार्ड ,आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण ह्याबाबत जनजागृती करण्यात आली.
दि. 30 सप्टेंबर रोजी आयुष्यमान भव  मोहीमे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील काही आरोग्य संस्थाना भेटी देवुन उपक्रमाची पडताळणी केली. डॉ. नितिन वानखेडे यांनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी व महागाव तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ईंदोरा व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र परसवाडा तसेच गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी ,आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र कुडवा-1, कुडवा-2 व धापेवाडा आरोग्य संस्थाना भेटी दिल्या. त्यांचे समवेत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निंरजन अग्रवाल व जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक रविंद्र श्रीवास, पियुष श्रीवास्तव, पवन फुंडे, देवचंद चव्हाण, प्रमोद डिब्बे, पवन वासनिक हे सुद्धा उपस्थित होते.
सर्व आरोग्य संस्थानी तपासणी होत असलेल्या लोकांची माहिती पोर्टल वर अद्यावत भरणे तसेच गावनिहाय यादी ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी सर्व आरोग्य संस्थाना दिले आहे.
भेटी दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत,तिरोडा  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती घोडमारे, केशोरीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पिंकु मंडल, ईंदोराचे वैद्यकिय अधिकारी डॉ.आदित्य दुबे, एकोडीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. विवेकांनद चाचेरे, व तेथील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.