विद्यापीठाच्या महात्मा गांधी शांती केंद्राने विकसित केलेल्या गांधी लिखाणाच्या कॉर्पसचे अनावरण
मुंबई, दि. ०५ ऑक्टोबरः मुंबई विद्यापीठाने “लेक्सिकल गांधी” हा अत्यंत अभिनव प्रकल्प राबवत महात्मा गांधी यांच्या लिखाणाचा कॉर्पस विकसीत केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या महात्मा गांधी शांती केंद्रातर्फे हा प्रकल्प विकसीत करण्यात आला असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून या प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी शांती केंद्राने (एम.जी.पी.सी.), “गांधी आणि भाषा” या विषयावर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले होते.
२०२२ ला वर्षभरापूर्वी महात्मा गांधी शांति केंद्रामध्ये “लेक्सिकल गांधी” हा प्रकल्प डॉ. विवेक बेल्हेकर आणि राधिका भार्गव यांनी गांधी जयंतीच्या दिवशी सुरु केला होता. कॉर्पस म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा विषयाच्या लिखाणातील सर्व शब्द संग्रह. शब्द मोजणी कॉर्पसमध्ये प्रत्येक शब्द किती वेळा वापरला आहे याची माहिती असते. मुंबई विद्यापीठात विकसित केलेल्या गांधीजींच्या लिखाणाच्या कॉर्पसमध्ये प्रत्येक शब्दाचा वापर प्रत्येक वर्षी किती वेळा होतो याचीही माहिती आहे. उदाहरणादाखल, गांधीजींच्या लिखाणात सत्य (truth) आणि अहिंसा या दोन्ही या शब्दाचा वापर १९०० पासून वाढत जातो परंतु अहिंसा या शब्दापेक्षा सत्य हा शब्द अधिक प्रमाणात वापरला गेला आहे. या प्रकारची माहिती संशोधक, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वांनाच उपयोगी पडेल असा विश्वास डॉ. विवेक बेल्हेकर यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे डॉ. विवेक बेल्हेकर यांनी संशोधक आणि विद्यार्थ्यांना कॉर्पस उपलब्ध करून देण्यासाठी वेब अँप्लिकेशन (वेबअॅप) विकसित केले आहे.
“लेक्सिकल गांधी” कॉर्पस हा ६० वर्षांहून अधिक काळ महात्मा गांधीजींच्या शब्दांच्या वापरामध्ये झालेल्या बदलाची माहिती प्रदान करतो. हे वेबअॅप गांधीवादी विषयांसाठी मजकूराचे विश्लेषण करण्यासाठी टेक्स्ट-माइनिंगसाधन देखील उपलब्ध करते. हा प्रकल्प गांधीवादी साहित्यातील भावनामधील बदलाची माहिती देतो. इंटरनेटवर हे वेबअॅप https://lexical-gandhi.shinyapps.io/lexical-gandhi/ या नावाने उपलब्ध करून देण्यात आले असून राधिका भार्गव यांनी वेबअॅपचे प्रात्यक्षिक केले.
भाषेच्या संदर्भातील सामाजिक समस्यांवर गांधीवादी विचार कसा उपयोगी पडेल यावर या परिसंवादात चर्चा झाली. डॉ. विवेक बेल्हेकर यांनी “लेक्सिकल गांधी” प्रकल्पाचे निष्कर्ष सादर करून गांधीवादी साहित्यातील भावविश्लेषणाचे निष्कर्ष मांडले. गांधीवादी विचारसरणीतील आठ वेगवेगळ्या विषयांच्या शोधाबद्दल मत मांडताना १९१५ आणि १९४५ हे दोन कालखंड गांधीजींच्या मानसिक जडणघडणीमधील महत्त्वाचे बदल दर्शवित असल्याचे निष्कर्ष त्यांनी मांडले. येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन यातून मिळालेल्या माहितीचे शोधनिबंध व पुस्तकात रूपांतर आणि ऑनलाइन माध्यमातून सर्वांना वापरासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
गांधीवादी विचारवंत आणि लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ म्हणाले की, गांधीजी हे भाषिक योगी होते. भारतातील भाषिक विविधतेमधून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यात महात्मा गांधींनी ऐतिहासिक भूमिका बजावली. गांधींनी देशाची एकता टिकवून ठेवणारे उपाय दिले. गांधीजींनी स्वतः केलेल्या संत तुकारामांच्या काही अभंगाचे इंग्रजीत अनुवाद करुन असा पायंडा पडला असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषाशास्त्रज्ञ डॉ. अविनाश पांडे यांनी सर्वासाठी सारखी संभाषण प्रणाली तयार करणे आणि विशिष्ट भाषिक गटांची विविधता जतन करणे अशी भाषेची दोन कार्ये विशद केली.