नवी दिल्ली, 10 : गंभीर तीव्र कुपोषण (एसएएम) असलेल्या मुलांवर उपचार करत, पूरक आहार देऊन, तसेच आरोग्य सेवा पुरवून अशा मुलांना कुपोषणाच्या जाळ्यातून बाहेर काढल्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावतीतील तिवसा तालुक्याच्या श्रीमती मेघा धीरज बनारसे यांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विज्ञान भवन येथे महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभा, सचिव इंदीवर पांडे, संयुक्त सचिव राजीव मांझी, यूनिसेफ संस्थाच्या भारतीय प्रतिनिधी सिंथिया मेककेफरी, संचालक सुझान फर्ग्युसन, जागतिक आरोग्य संघटनेच्या भारत प्रतिनिधी श्रीमती पेदान उपस्थित होत्या.
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या क्षेत्रात श्रीमती मेघा बनारसे यांनी आपली जबाबदारी निभावली असून त्यांना या उल्लेखनीय कार्यासाठी उत्कृष्ट अंगणवाडी सन्मानाने आज गौरविण्यात आले. तिवसा तालुक्यातील रावगुरूदेवनगर गावच्या श्रीमती बनारसे यांनी त्यांच्या क्षेत्रातील गंभीर तीव्र कुपोषण बालकांवर (SAM- Severe Acute Malnutrition) वेळीच उपचार केले व त्यांना पूरक आहार दिले. त्याच्या घरी जाऊन पालकांना पूरक आहाराबाबत संपूर्ण जाणीव दिली व ग्राम बाल विकास केंद्राच्या (VCDC) मार्फत त्याला पूरक आहार देण्यात आला. यावेळी त्यांनी बालकाचे उदाहरण दिले, त्या बालकाचे वजन सुरूवातीला 6 किलो 400 ग्राम होते. व श्रीमती बनारसे त्यांच्याद्वारे पुरविण्यात आलेल्या आहारानंतर त्याचे वजन 7 किलो 800 ग्राम झाले व एसएएम मधून बालक बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्रीमती इराणी यांनी आज तीव्र कुपोषणाचा सामना करण्यासाठी मुलांमधील कुपोषण व्यवस्थापनासाठी प्रोटोकॉल पुस्तिकेचे प्रकाशन केले. हा प्रोटोकॉल अंगणवाडी स्तरावर कुपोषित बालकांची ओळख आणि व्यवस्थापनासाठी तपशीलवार पावले प्रदान करेल, ज्यामध्ये संदर्भ, पोषण व्यवस्थापन आणि पाठपुरावा काळजी यांचा समावेश आहे. कुपोषण तेव्हा होते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आहारात शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक पोषक आणि उर्जेची कमतरता असते. यात कुपोषणामुळे वाढ खुंटलेली आणि अतिपोषणामुळे लठ्ठपणा आणि संबंधित समस्या या दोन्हींचा समावेश होतो. कुपोषित बालकांची ओळख आणि त्यांच्यावर उपचार हा मिशन पोशन २.० चा अविभाज्य पैलू आहे. या कार्यक्रमात देशभरातील महिला व बालविकास आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले.