आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची- पो.नि. बाजिया

0
21

गोंदिया – आपत्ती दरम्यान गरजूंना तात्काळ मदत पुरविण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्य करीत असते. आपत्ती काळात नागरिकांचा प्रतिसाद प्रशासनाला नेहमी लाभते. आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे नागरिक. त्यामुळे विद्यार्थी जीवनात आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे चे पो.नि. मुकेश कुमार बाजिया यांनी, भवभूती महाविद्यालय, आमगाव व जगत कला वाणिज्य महाविद्यालय, गोरेगाव येथे केले.

जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात दिनांक 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2023 दरम्यान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.10 ऑक्टोबर रोजी आमगाव व गोरेगाव तालुक्यात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमात आमगाव तालुक्याचे तहसीलदार रमेश कुंभरे, भावभुती महाविद्यालयचे प्राचार्य रहांगडाले, प्राध्यापक तावडे, श्री वेलाडी, ना.तह.गजभिये, जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रमुख नरेश उईके प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच गोरेगाव तालुक्यातील जगत कला वाणिज्य महाविद्यालय, गोरेगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाजीया म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने समाजात आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत होईल. आपत्ती काळात परिस्थीतींना तोंड देण्यासाठी सुरक्षा व बचाव याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भविष्यात येणाऱ्या आपत्तीमुळे जीवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करायचे असेल तर प्रथम प्रतिसादक (First Responders) म्हणून भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी NDRF पुणे कडून विविध प्रकारचे आपत्ती विषयक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
गोरेगाव तालुका येथील जगत महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात तहसीलदार के.के.भदाणे, प्राचार्य एम.एच. भैरम, ना.तह. जी.आर. नागपुरे, डॉ.जे.बी. बघेले, डॉ.एस.एस. राहांगडाले, अ.का. हर्षल लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. आमगाव व गोरेगाव तालुक्यात झालेल्या जनजागृती कार्यक्रमात दोन्ही तालुक्यातून बहुसंख्येने विद्यार्थी/विद्यार्थिनी तह.कार्यालयाचे कर्मचारी/तलाठी,मंडलाधिकारी व महाविद्यालयातील शिक्षक,स्टाफ उपस्थित होते.