तिरोडा, दि.12 : नाल्याशेजारी एक अनोळखी महिला मृतावस्थेत असल्याची माहिती वेळेचे भान जाणून पोलीस पाटलाने तिरोडा पोलिसांना दिली. तात्काळ तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची शहानिशा केली. दरम्यान सदर महिला अत्यंत अशक्तपणामुळे जवळजवळ शुद्ध हरपलेल्या स्थितीत असल्याचे समजले. पोलिसांनी तिला पाणी पाजल्यावर ती थोडी बरी झाली आणि जणू मृत महिला जिवंत झाल्याचाच प्रत्यय आल्याने पोलिसांना आनंद झाला. थोड्या वेळाने पोलिसांनी तिला जेवण दिले आणि ती बोलण्याच्या स्थितीत आली. ही घटना बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी घडली.
सविस्तर असे की, 11 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.00 वाजताच्या सुमारास नवेझरी गावचे पोलीस पाटील ओम भांडारकर यांनी, नवेझरी गावासमोर नाल्याजवळ एक महिला डांबरी रस्त्याच्या बाजूला मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती तिरोडा पोलिसांना दिली. त्यावरून तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, सोबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड, पोलीस पोहवा कुळमेते, पोलीस अंमलदार अख्तर व महिला सैनिक चौधरी यांच्यासह नवेझरी गावांमध्ये जाऊन सदर प्रकरणाची शहानिशा केली. दरम्यान सदर महिला मृत नसून गतिमंद आणि अशक्तपणा आल्याने त्या ठिकाणी पडून आहे, असे लक्षात आले. पोलीस पाटलांनी सदर महिला मृत पडून असल्याचे सांगितले असले तरी वास्तविक ती महिला जिवंतस्थितीत होती.
थोड्या वेळाने तिला पाणी दिल्यानंतर तिला थोडे बरे वाटले. त्यानंतर तिला नवेझरी येथे आणून जेवण दिल्यानंतर ती बोलण्याच्या परिस्थितीत आली. त्यानंतर महिला सैनिक शिला चौधरी यांच्याकडून विचारपूस करण्यात आली असता तिने गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 5-6 वेगवेगळ्या गावांची नावे सांगितली. त्यानुसार सदर गावांमधील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांना तिचे फोटो पाठवून शहानिशा केली असता तिचे नाव गुड्डी मरकाम, वय अंदाजे 35 वर्षे असे असून ती तिची मावशी नामे निलवंता धूर्वे, रा.शंभूटोली, ता.गोरेगाव यांच्याकडे राहत असल्याचे समजले.