क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे महिलांच्या सुप्त गुणांना मिळाली संधी…

0
13

गोंदिया,दि.17- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटन, गोंदिया यांच्यावतीने महिलांकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फॉलोवर्स महिला संघटनाच्या वतीने 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती, महिलांकरिता व त्यांच्या कुटुंबियांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत सिकलसेल तपासणी व उपचार शिबीर, तरुणांना व्यवसायामध्ये आणण्याकरिता रोजगार मेळावा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच शृंखलेमध्ये दिनांक 15 ऑक्टोबरला महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता सांस्कृतिक पर्वाचे आयोजन संथागार, मरारटोली येथे करण्यात आले होते. या पर्वामध्ये एकल नृत्य स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा, फॅशन शो स्पर्धा, यांच्या समावेश होता. अनेक महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन दिलखुलास नृत्याचे प्रदर्शन केले. प्रेक्षकांनीही त्यांना तेवढ्याच दिलखुलासपणे दाद दिली. या कार्यक्रमांमध्ये सर्व स्तरातील महिलांनी सहभाग घेतला.
दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक महिला ही वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर येत असते, कधी ते गृहिणी असते, कधी ती आई असते, कधी ते बहीण असते, कधी पत्नी असते, या वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या नात्यांना सांभाळून आपली चूल आणि मूल, आपल्या घराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून अनेक महिला आज नोकरीच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत. अशाच महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या सांस्कृतिक पर्वाच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटन गोंदिया यांच्या वतीने एक संधी उपलब्ध करून देण्यात आली व या मिळालेल्या संधीचे सर्व स्तरातील महिलांनी सोने केले.
वर्ग 1 व २ अधिकारी वर्गातील महिला, इतर महिला अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्राध्यापक, लेक्चरर्स, फार्मसिस्ट, क्लर्क अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच अतिशय उत्कृष्ट गृहिणी असलेल्याही वयोगट 25 ते ६५ वर्षांपर्यंतच्या तरुणींनी या सांस्कृतिक पर्वामध्ये आपला सहभाग नोंदविलेला. विशेष म्हणजे सीनियर सिटीजन ग्रुप करता सुद्धा राखीव स्पर्धा आयोजकांद्वारे ठेवण्यात आलेल्या होत्या. एकलनृत्य स्पर्धेमध्ये गट अ वयोगट २५ ते ४० पर्यंत मध्ये एकूण २२ स्पर्धक सहभागी झाले होते. गट ब एकनृत्य स्पर्धा वयोगट ४० च्या पुढे यामध्ये एकूण २४ स्पर्धक सहभागी झाले होते. सामुहिक नृत्य स्पर्धेमध्ये वयोगट २५ च्या पुढे १५ ग्रुपनी च्या अनेक महिलांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची रंगत वाढली ते फॅशन शो या कार्यक्रमामुळे. फॅशन शोमध्ये 40 महिलांनी सहभाग घेऊन सादरीकरण केले. यामध्ये सगळ्या स्पर्धकांनी जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली व दादही मिळविली.
अनेक महिलांनी यातून प्रथमच स्टेज मिळाल्याचे मनोगतही व्यक्त केले आणि ही संधी मिळाल्यामुळे त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटनाचे आभार सुद्धा व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये श्रीमती तोषी असाटी, भरतनाट्यम नृत्यांगना, रायपूर, श्रीमती श्रुती केकत, लावणी क्वीन गोंदिया व श्रीमती तेजस्विनी गणवीर, नृत्यांगना व नृत्य नृत्य प्रशिक्षक या तिघींनी स्पर्धेच्या निर्णायकांची भूमिका पार पाडली. स्पर्धेच्या निर्णय देताने त्यांनी अतिशय बारकाईने निरीक्षण करुन सगळ्या नृत्यांची परिक्षण केले व त्यांच्या गुणांकनुसार प्रथम द्वितीय तृतीय व कंसलेशन प्राईस वितरित करण्यात आली. समूह नृत्यांमध्ये प्रथम क्वीन बीज ग्रुप, द्वितीय माळी महिला ग्रुप, तृतीय वोपाली वैद्य ग्रुप, तसेच दोन ग्रुपना कांसलेशन प्राईझ , सिनियर सिटीझन ग्रुप व चित्र रेखा मेश्राम ग्रुपला देण्यात आले. एकनृत्य गट अ मध्ये प्रथम ज्योती गजभिये, द्वितीय ज्योती चव्हाण, तृतीय प्राची डोंगरे-बनसोड, दोन कांन्सलेशन प्राईझ श्वेता भालाधरे व वोपाली वैद्य यांना वितरित करण्यात आले. एक नृत्य गट ब मध्ये प्रथम समता गणवीर, द्वितीय ऊषा कठाने, तृतीय ज्योती डोंगरे, यांनी पटकावले. तर कांसलेशन प्राईझ दर्शना वासनिक व वैशाली कोहपरे यांना वितरीत केले.
फॅशन शोमध्ये प्रश्नोत्तराचा राउंड अतिशय मजेदार व सगळ्यांना आवडणारा होता. यामध्ये प्रश्नोत्तराच्या दरम्यान स्पर्धकांनी अतिशय दिलखुलासपणे प्रश्नांची उत्तरे देऊन प्रेक्षकांची दाद मिळविली. निर्णयाकांच्या निर्णयाला अधीन राहून फॅशन शोचे विजेते प्रथम क्रमांक प्राची बनसोड -डोंगरे, द्वितीय क्रमांक सुप्रिया डोंगरे, तृतीय क्रमांक वाणी लांजेवार, व तीन कॉन्सलेशन प्राईस अलका भरणे, रीमा टेंभुर्णीकर व मनीषा मेश्राम यांना वितरित करण्यात आले.
या सांस्कृतिक पर्वामध्ये संम्मिलीत झालेल्या सर्व स्पर्धकांना संघटने तर्फे सहभागीता प्रमाणपत्र देण्यात आले व सर्व विजेत्यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता यावर्षीच्या समन्वयिका आम्रपाली वनकर, आरती मानकर, अनिता मेश्राम, अलका बनसोड यांनी भरपूर प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या सावित्रीबाई फुले फॉलोवर्स महिला संघटनाच्या फाउंडर मेंबर डॉ. शिल्पा मेश्राम, सदस्य डॉ प्रियंका शेंडे व सर्वच सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संघटनातील सर्व महिला सदस्यांनी खूप जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता ऊके व वैशाली खोब्रागडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती मानकर, समन्वयिका यांनी सादर केले. तर शेवटी कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून तीनही जजेस ने सुद्धा आपले नृत्याचे परफॉर्मन्स प्रेक्षकांसमोर सादर करून प्रेक्षकांची वाह-वाह मिळविली. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटनाच्या वतीने आभार मानण्यात आले.