फडणवीसांच्या बंगल्यात भाजप शहराध्यक्षाने डीसीपींची कॉलर पकडली

0
22

नागपूर – नागपुरात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानात भाजप शहराध्यक्षाने पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या कॉलरला हात घालत धक्काबुक्की केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत, याचे धक्कादायक चित्रच यानिमित्ताने समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर मुक्कामी आहेत. आज दुपारी ‘देवगिरी’ निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आले होते. त्यात भाजप युवा शहरप्रमुख पुष्कर पोशेट्टीव हेसुद्धा त्यांच्या समर्थकांसह आले होते. मात्र, बंगल्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तिथून त्यांनी जबरदस्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने वादाला तोंड फुटले

हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे संजय राऊत

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागपुरातील हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे असून महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

पुष्कर पोशेट्टीव मुख्य प्रवेशद्वाराऐवजी एक्झिट पॉइंटवरून बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना उपायुक्त राहुल मदने यांनी अटकाव केला असता त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. पोशेट्टीव यांनी मदने यांच्या खाकी वर्दीची कॉलर पकडत त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे वातावरण तापले.