मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गटांकडून राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणारे निर्णय घेतले जातात. दोन्ही गटांची नेमकी भूमिका काय हेच बर्याचदा स्पष्ट होत नाही. अशातच आता अजित पवार आणि शरद पवारांच्या गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही गट आगामी पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार नाहीत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात लढाई सुरु असल्याने चिन्ह गोठवण्यात येऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामध्ये मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या पाच राज्यांचा समावेश आहे. मात्र, या पाचही राज्यांमध्ये राष्ट्रवादीचा तितकासा प्रभाव नाही. शिवाय राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु आहे. दोन्ही गटांपैकी एकाने जरी निवडणूक लढवायचे ठरवले तर कायदेशीर पेच निर्माण झाला असता आणि त्यानंतर चिन्ह गोठवण्याची शक्यताही निर्माण झाली असती. त्यामुळे दोन्ही गटांनीही या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात आहे. हे दोन्ही गट आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला देखील लागले होते. मात्र, येत्या ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या चिन्हाची पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे चिन्हाबाबतचा पेच निर्माण झाला असता. त्यामुळे ही लढाई सुरु असताना दोन्ही गटांकडून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला गेला.