हे रानटी हत्ती आहेत, गुरांचा कळप नाही

0
42

गडचिरोली : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने तीन आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या दिभना गावातील शेतात घुसलेल्या हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न काही शेतकरी करत होते. या गडबडीत चवताळलेला एक हत्ती मागे लागला. त्यामुळे पळण्याच्या प्रयत्नात होमाजी गुरनुले हे खाली पडले आणि हत्तीने त्यांना सोंडेने उचलून चिरडले.

ही घटना मंगळवारच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या हत्तींपासून नागरिकांनी लांब राहावे, अशी सूचना वडसा वनविभागाच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून या भागातील नागरिकांना केली जात होती. शेतातील पिकांचे नुकसान झाले तर होऊ द्या, त्याची भरपाई देता येईल, पण हत्तींच्या वाटेला जाऊ नका असे सांगितले जात होते. मात्र हत्ती काय वाघासारखे हिंस्र असतात काय, असा विचार करून काही शेतकरी त्यांना गुरांच्या कळपाला हुसकावून लावतो त्याप्रमाणे आपल्या शेतात घुसण्यापासून रोखण्याचा आणि दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी होमाजी गुरनुले यांच्यासोबत असलेला एक शेतकरी प्रसंगावधान राखत आडोशाला गेल्यामुळे तो थोडक्यात बचावला.

खासदार अशोक नेते यांच्याकडून आर्थिक मदत

दरम्यान या घटनेनंतर बुधवारी खासदार अशोक नेते यांनी दिभना येथे गुरनुले यांच्या घरी जाऊन त्यांच्या वृद्ध वडीलांची सांत्वना केली. वनविभागाच्या वतीने तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये आणि खासदार अशोक नेते यांनी आपल्या वतीने काही आर्थिक मदत त्यांना दिली. यावेळी गुरनुले यांचे अनेक नातेवाईक आणि गावकरी यावेळी उपस्थित होते.