पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

0
9

गोंदिया,दि.२5 : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी २३ मे रोजी पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदियातील काही भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या आठ दिवसात नाले, गटारे स्वच्छ करण्याचे निर्देश नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले. गोंदियातील बाजपेई चौक, सूर्याटोला, संजयनगर, मरारटोली यासह अन्य भागाची पाहणी केली. ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या वस्त्यांचे क्षेत्र कसे कमी होईल यादृष्टीने लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या दिवसात उघडे गटार, तसेच भूमीगत गटार कचऱ्याने तुंबणार नाही यासाठी नगर परिषदेने विशेष काळजी घ्यावी. नाल्या पाण्यामुळे तुंबून घाण पाणी रस्त्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहणार नाही याचे नियोजन करण्याचे सांगितले. पॉलिथीनमुळे मोठ्या प्रमाणात गटारे तुंबत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना जलजन्य आजारांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी नगर परिषदेने आतापासून नाले गटारे, कचरा कुंड्या स्वच्छ ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा योजनेचे पाईप लाईन लिकेज होऊन नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ येणार नाही यासाठी अशा लिकेज असलेल्या पाईप लाईन तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक वार्डातील नागरिकांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी नगर परिषदेचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी के.डी.मेश्राम उपस्थित होते.