27 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
गोंदिया, दि.26 : भारत निवडणूक आयोगाचे 25 सप्टेंबर 2023 चे पत्रान्वये दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम घोषित झाला असून 27 ऑक्टोबर 2023 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे जाऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन दयावे किंवा NVSP, VHA व VPORTAL या पोर्टलवर लॉगीन करुन आपले नाव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावे. तसेच 4 नोव्हेंबर 2023 (शनिवार), 5 नोव्हेंबर 2023 (रविवार), 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार) व 26 नोव्हेंबर 2023 (रविवार) या चार दिवशी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित विशेष मोहिम अंतर्गत 18-19 वयोगटातील मतदार, तृतीय पंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांग मतदार यांना जास्तीत जास्त सहभागी करुन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये/ छायाचित्रामध्ये दुरुस्ती, रहिवाशाचे स्थलांतरण (विधानसभा अंतर्गत/ बाहेरील), मतदार ओळखपत्र बदलुन देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकीत करावयाचे असल्यास नमुना 8 तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी करण्याकरीता नमुना 6-ब भरुन संबंधीत आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा NVSP, VHA व VPORTAL या पोर्टलवर लॉगीन करुन संबंधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करुन विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी कळविले आहे.