अर्जुनी मोर. :–पूर्वी वंशाचा दिवा मुलाला मानायचे, म्हातारपणी मुलगा सांभाळ करील अशी जन्मतात्यांची मनोमन भावना असते. असे असतानाच आपल्याला एकुलती एक मुलगी असून तिच्याबद्दल सार्थ अभिमान बाळगणाऱ्या पित्याला डॉक्टर मुलीने मुलाची उणीव भासू दिली नाही. परंपरेला फाटा देत विवाहित असलेल्या डॉक्टर श्वेता डोंगरवार( कुलकर्णी )यांनी जन्मदात्याच्या पार्थिवाला चिताग्णी देऊन मुलांचे कर्तव्य पार पाडून समाजात नवा आदर्श निर्माण केला.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना /बाकटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या तथा झरपडा येथील रहिवासी डॉक्टर गजानन डोंगरवार यांच्या सुनबाई डॉक्टर श्वेता मनोज डोंगरवार( कुलकर्णी) या वडील प्रवीण कुलकर्णी यांचा सासर घरी सांभाळ करीत होत्या. प्रवीण कुलकर्णी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी तारीख 4 दुपारी तीन वाजताच्या दरम्यान निधन झाले.त्यांना श्वेता कुलकर्णी ही एकुलती एक मुलगी आहे.24 वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यानंतर मुंबईत प्रवीण कुलकर्णी यांनी श्वेताचे संगोपन करून एमबीबीएस एमडी पर्यंत शिक्षित केले. मुलीच्या इच्छेप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा निवासी डॉक्टर मनोज डोंगरवार यांच्याशी विवाहबद्ध करून दिले. मुली शिवाय कोणीही नसल्याने सन 2013 पासून प्रवीण कुलकर्णी यांचे वास्तव्य झरपडा येतील आपले व्याही डॉक्टर गजानन डोंगरवार त्यांच्याकडे होते.शनिवारी दुपारी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रवीण कुलकर्णी वय 71 यांचे निधन झाले. सर्व विधी मुलगी श्वेता डोंगरवार यांनी केले. रविवारी दुपारी बारा वाजता झरपडाच्या मोक्षधामावर डॉक्टर श्वेता डोंगरवार यांनी जन्मदात्या पित्याच्या पार्थिवाला चिताग्नी देऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. याप्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यासह आप्तस्वकीय नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.