जिल्हाधिकाऱ्यांकडून जल जीवन मिशनचा आढावा

0
12

वाशिम, दि. 07  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी  6 नोव्हेंबर रोजी वाकाटक सभागृहात जल जीवन मिशन कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

            श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जिल्हयात ज्या ठिकाणी जल जीवन मिशनची कामे अद्याप सुरु झालेली नाही, ती कामे तातडीने सुरु करावी. मालेगांव हा आकांक्षित तालुका असल्याने या तालुक्यातील जल जीवनची कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळजोडणी देण्यात यावी. गावातील कोणतेही कुटूंब नळजोडणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शुध्द व स्वच्छ पाणी कुटूंबांना जलजीवनच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यायचे आहे. घरीच नळजोडणी मिळणार असल्यामुळे महिलांचे पाण्यासाठी होणारे कष्ट कमी होणार आहे. जलजीवन मिशनमुळे पाणी टंचाईवर मात होण्यास मदत होणार आहे. या मिशनमुळे जिल्हा टँकरमुक्त झाला पाहिजे. असे त्या यावेळी म्हणाल्या.

            जल जीवन मिशनच्या माध्यमातून कुटूंबांना नळजोडणी देण्याचे काम प्राधान्याने करावे असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जिल्हयातील जल जीवन मिशनची जानेवारी 2024 पर्यत जास्तीत जास्त कामे करण्यात यावी. आगामी निवडणूकीची आचारसंहिता लक्षात घेता सर्व कामे तातडीने पुर्ण करावी. जिल्हयात पाण्याचा सिंचनासाठी अवैधपणे वापर होत असेल तर वीज वितरण कंपनीने संबंधितांवर कारवाई करावी. असे त्यांनी सांगितले.

              जिल्हयात 2 लक्ष 19 हजार 554 ग्रामीण कुटूंब आहे. 5 नोव्हेंबरपर्यत 1 लक्ष 78 हजार 280 कुटूबांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळजोडणी देण्यात आली आहे. 41 हजार 274 कुटूंबांना नळजोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्हयात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 560 गावात 521 योजना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 22 गावात 50 योजना आहे. 52 गावातील 51 योजना ह्या निविदा प्रक्रीयेमध्ये असून जिल्हयातील 101 गांवे हर घर जल घोषित झाले असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांनी दिली.

सभेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश राठोड, मृद व जलसंधारण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता अपूर्वा नानोटकर, जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूर्वेज्ञानिक श्री. कडू व वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.