रुग्णालयाला दोन डॉक्टर मिळाले

0
9

नवेगावबांध : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करून अव्यवस्था दूर करण्याच्या मागणीकरिता नवेगावबांध येथील नागरिकांनी ताला ठोको आंदोलनाचा पवित्रा घेतला होेता. त्याचा धसका घेत आंदोलनकर्त्यांना शांत करून आरोग्य प्रशासनाने तातडीने दोन अधिकाऱ्यांची नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात बदली केली.

या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला दि.२४ च्या सायंकाळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आंदोलन संपविण्याची विनंती केली. परंतु १५ दिवसापूर्वी याच अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर आंदोलन स्थगित केले असताना त्याची पूर्तता होत नसल्याचे सांगत आंदोलनकर्ते भूमिकेवर कायम राहिले.

बुधवारला सकाळी ११ वाजता असंख्य आंदोलनकर्ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. उपस्थित पलिसांनी रुग्णालयाच्या गेटवरच त्यांना रोखून धरले. त्यांचा रोष लक्षात घेता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघमारे हे आंदोलकांसमोर आले आणि त्यांच्या मागण्या रास्त असल्याची भावना व्यक्त करुन रुग्णालयाची बिघडलेली रुग्णसेवा पूर्वीसारखी सुरळीत होण्याकरिता दोन वैद्यकीय अधिकारी ताबडतोब या रुग्णालयासाठी देण्याचा निर्णय घेतला. देवरी येथील रुग्णालयाचे डॉ.राहूल बागडे यांना पुढील आदेशापर्यंत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे रुजू केले व दुसरे डॉक्टर सायंकाळपर्यंत रुजू होतील, असे सांगितले.

यावेळी अर्जुनी मोरगावचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, नवेगावबांधचे एपीआय राठोड, उपस्थित होते. आंदोलकांमध्ये विजय डोये, नवलकिशोर चांडक, सरपंच लिना डोंगरवार, विलास कापगते, दिलीप जैन, होमराज पुस्तोडे, पितांबर काशिवार, रितेश जायस्वाल, रामदास बोरकर, दिनेश खोब्रागडे, जितेंद्र कापगते, धनराज डोंगरवार, नरेश जायस्वाल, चंद्रभान टेंभुर्णे, संजय खरवडे, प्रकाश तरोणे, प्रविण गजापुरे, रेशिम काशिवार, अशोक हांडेकर, गुलाब करंजेकर, प्रकाश कुसराम, बाबुराव नेवारे, वसंत उजवने, योगेश पुस्तोडे, योगेश कापगते, अमृत कापगते, पंकज साखरे व गावातील नागरिक उपस्थित होते.