नवे आत्मभान निर्माण करणाऱ्या शिक्षणाची गरज -प्रा.डॉ.संतोष सुरडकर

0
7

प्रगती वाचनालयात ग्रंथचर्चा व दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

बुलढाणा  शिक्षण नाकारण्याची संस्कृती असलेल्या या देशात शिक्षण घेण्याइतपत क्रांती झाली तरी शाळा महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातून पध्दतशीरपणे बौध्दीक व सांस्कृतिक गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था राबविली जात आहे. त्यामुळे पारंपारिक जाणिवा नेणिवा उध्वस्त करुन नवे आत्मभान निर्माण करणारी दृष्टी विकसित करणारे शिक्षण हवे आहे. त्यादृष्टीने प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांचा “डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातीसंघर्ष” हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रा. डॉ. संतोष सुरडकर यांनी केले.
प्रगती वाचनालय येथे १७ नोव्हेंबर रोजी ग्रंथचर्चा व दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रंथचर्चेचे भाष्यकार म्हणून डॉ. संतोष सुरडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. समाजवादी शिक्षण हक्कसभा चे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर होते. ग्रंथलेखक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, काॅ. दादा रायपुरे, साहित्यिक सुरेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ . दिलीप चव्हाण यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व संत तुकारामांच्या मूर्तीस अभिवादन करुन दिवाळी अंक प्रदर्शनी तथा ग्रंथचर्चा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रंथावर भाष्य करतांना प्रा.डॉ. संतोष सुरडकर पुढे म्हणाले की, सत्ताधारी व शोषक समाजाने प्रत्येक काळात स्वतःला हवी तशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याविरोधात उठाव करण्याचा प्रयत्न झाला तर प्रतिक्रांतीचे सूत्र निर्माण करण्याचे काम व्यवस्थेने केले. आजच्या काळातही वेगळे काहीच घडत नसून सर्व सामान्यांपासून बेधडकपणे शिक्षण हिरावून घेण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक व्यवस्थेचे सैद्धांतिक आकलण करणे त्यासाठी गरजेचे असून वर्ग, पितृसत्ता व जातीयसंस्थेचे परीणाम शिक्षण व्यवस्थेवर कसे होत राहतात, याबाबत डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातीसंघर्ष या ग्रंथात अत्यंत अभ्यासपूर्ण उकल करण्यात आल्याची माहिती डॉ. सुरडकर यांनी दिली.
शेतकरी आत्महत्येला कृषी विद्यापीठांचे संशोधन जबाबदार – प्रा. डॉ. दिलीप चव्हाण

कृषीचे शिक्षण शालेय शिक्षणात असायला हवे, अशी मांडणी महात्मा फुले यांनी केली होती. मात्र राजकीय व्यवस्थेने त्यांच्या विचारांच्याविरोधात जावून फक्त कृषी विद्यापीठांची स्थापना केली. या विद्यापीठांनी संशोधनाच्या नावाखाली हायब्रीड, रासायनिक व कीटकनाशकांचा (हाराकी) फाॅर्म्यूला बाहेर आणला आणि आज तोच फाॅर्मूला भांडवलदारांसाठी उपयुक्त तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे, असे मत डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केले. सत्य लिहीणाऱ्यांना, इतिहासाची चिकित्सा करणाऱ्यांना प्रत्येक काळात त्रास सहन करावा लागला. त्यांचे लिखाण काळाच्या पटलावरुन नाहीसे करण्याचे षडयंत्रही रचण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगून नवी मांडणी करणाऱ्या प्रत्येक लिखाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याची जबाबदारी आपण उचलायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. डॉ. संतोष आंबेकर यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रतिगामीत्वावर सखोल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले तर पंजाबराव गायकवाड यांनी आभार मानले. मान्यवरांचे स्वागत किसन वाघ , मांगीलाल राठोड,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष सुभाष किन्होळकर, प्रदीप हिवाळे, दीपक फाळके, शाहीर डी. आर. इंगळे, रविकिरण टाकळकर, पुरुषोत्तम गणगे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. एस. एम . कानडजे, दत्ता हिवाळे, विजय अंभोरे रवींद्र इंगळे चावरेकर, विजया काकडे, पत्रकार गणेश निकम,अमोल रिंढे, राम वाडीभस्मे ,अशोक गोरे, दिलीप कंकाळ, शशिकांत जाधव, दीपक फाळके, प्रमोद टाले, अनिसचे शिवाजी पाटील, डॉ संगीता बावस्कर, मुकुल पारवे, डी. एम.कानडजे, ॲड. सुमित सरदार, कथाकार किसन पिसे, संतोष पाटील, शिवानी मोरे, कल्याणी काळे, निकिता मोरे, श्वेता आराख, गजानन अंभोरे, कु.सरला इंगळे, सारंग महाजन, ॲड. विजयकुमार कस्तुरे, बबन महामुने,इत्यादीसह चोखंदळ साहित्य,रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी प्रगती वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, आंबेडकरी साहित्य अकादमी, अक्षरदेह नाट्यकला संस्था, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, अंधश्रध्दा निर्मूलन समिती आदींनी परिश्रम घेतले.