यवतमाळच्या जेतवनमध्ये पर्यटनासाठी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

0
5

यवतमाळ : येथील नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरी (ता.यवतमाळ) येथील जेतवन पर्यटनस्थळी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी घडली. रिया किशोर बिहाडे (१२) रा. महागाव कसबा, काव्या धम्मपाल भगत (११) रा. मंगरूळपिर जि. वाशिम अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.जेतवन येथे ध्यान केंद्र असल्याने अनेक पर्यटक भेटीसाठी येतात. रिया ही काव्याची आतेबहीण आहे. काव्या मामा किशोर बिहाडे यांच्याकडे सुट्टीत आली होती. आई व मामा यांच्यासोबत ती जेतवन पर्यटनस्थळी आली. तेथे ध्यान केंद्रात सर्व कुटुंब बसलेले असताना दोघी बाहेरच्या परिसरात खेळत होत्या. अचानक त्या येथील तलावात पडल्या. पाण्यात मुली बुडत असल्याचे किशोर बिहाडे यांच्या लहान भावाच्या लक्षात आले. तेथे उपस्थित ऋषभ माहुरे, संतोष खंडागळे, अमोल चौधरी, वैभव महेर या तरुणांनी धाव घेऊन त्या चिमुकल्यांना तलावाबाहेर काढण्यासाठी मदत केली. दोघींनाही तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल ढोकणे, जमादार संजय राठोड यांनी घटनास्थळाला भेट देऊन नोंद घेण्यात आली आहे. आई, वडील आणि नातेवाकांसमोर घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.