विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने 54 तर राहुलने 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदीज करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. रोहित शर्माने वादळी सुरुवात करुन दिली, पण त्यानेही विकेट फेकली. शुभमन गिल याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुभमन गिल अवघ्या चार धावा करुन माघारी परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव संभाळला. पण रोहित नेहमीप्रमाणे मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
रोहितची आक्रमक सुरुवात, पण फलंदाजी ढेपाळली –
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 32 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 31 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी केली. तीन धावांनी रोहित शर्माचे अर्धशतक हुकले. रोहित शर्माने आपल्या छोटेखानी खेळीत तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनेही विकेट फेकली. श्रेयस अय्यर याने तीन चेंडूत एका चौकाराच्या मदतीने चार धावा करता आल्या. 81 धावांत भारतीय संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सावरला.
विराट कोहलीने डाव संभाळला –
आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी केली. एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर देत धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहली याने अर्धशतक ठोकले. विराट कोहली पुन्हा एकदा संयमी शतक ठोकेल, असाच अंदाज होता. पण विराट कोहलीच्या बॅटची कड घेऊन चेंडू थेट स्टम्पवर धडकला अन् कोट्यवधी लोकांचा हर्टब्रेक झाले. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी 109 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वात मोठी भागिदारी होय. विराट कोहली बाद झाल्यानंतर राहुलने जाडेजाच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने 63 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
राहुलने मोर्चा संभाळला –
विराट माघारी परतल्यानंतर राहुलने मोर्चा संभाळला. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. राहुलने संयमी अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर तो तंबूत परतला. मोक्याच्या क्षणी राहुल बाद झाल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या माफक राहिली. राहुल आणि जाडेजा यांच्यामध्ये 30 धावांची भागिदारी झाली. तर राहुल आणि सूर्या यांच्यामध्ये 25 धावांची भागिदारी झाली. पण भारतीय संघाने ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. परिणामी भारताच्या धावसंख्येला वेसन घालण्याचे काम ऑस्ट्रेलियाने केले.
अखेरीस विकेट फेकल्या –
केएल राहुलने 107 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने संयमी 66 धावा केल्या. रविंद्र जाडेजा याने 22 चेंडूत 9 धावांचे योगदान दिले. मोहम्मद शामी याने 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या. जसप्रीत बुमराह याला एक धाव करता आली. कुलदीप यादव आणि सूर्यकुमरा यादव यांनी अखेरीस किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादवने विकेट फेकली. सूर्यकुमार यादव 28 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने फक्त 18 धावा काढून तंबूत परतला. सूर्याला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. अखेरीस मोहम्मद सिराज याने 8 चेंडूत 9 धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. कुलदीप यादव याने 18 चेंडूत 10 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने भेदक मारा केला. स्टार्कने तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स, हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या आहेत. अॅडम झम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.