जोखीमग्रस्त व झोपडपट्टी भागातील १०३८२९ नागरिकांचा सर्व्हे
चंद्रपूर २० नोव्हेंबर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम सुरु २० नोव्हेंबर पासुन सुरू करण्यात आली असुन चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र तसेच संपुर्ण जिल्ह्यात सदर अभियान राबविण्यात येत आहे.
कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असुन केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे या संयुक्त अभियानाची आखणी आणि नियोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे तसेच समाजात क्षय व कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
सदर कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची कुष्ठरोग व क्षयरोगाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर,संशयीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान करण्यात येणार आहे. यात महानगरपालिका कार्यक्षेत्रात जोखीमग्रस्त व झोपडपट्टी भागातील एकूण २३९९८ घरातील १०३८२९ नागरिकांचा सर्व्हे करण्यात येणार असुन त्याद्वारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेणार आहे. मनपाच्या एकूण १४ पर्यवेक्षकांच्या नियंत्रणात ६९ पथकांमार्फत हि शोध मोहिम राबविल्या जाणार आहे.
प्रत्येक पथकामध्ये एक महिला व पुरुष कर्मचारी राहणार असुन प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचाऱ्यांमार्फत तर पुरुषांची तपासणी पुरुष कर्मचाऱ्यामार्फत केली जाणार आहे. कुष्ठरोग व क्षयरोगाची लक्षणे यात तपासण्यात येणार असुन लक्षणे आढळल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निदानासाठी संदर्भित करण्यात येणार आहे.
आयुक्त विपीन पालीवाल – संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीमेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यात येणार असल्याने सर्व नागरिकांनी घरी भेट देणाऱ्या मनपा आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून सहकार्य करावे.
कुष्ठरोगाची लक्षणे – त्वचेवर लालसर बधीर चट्टा,त्याठिकाणी घाम न येणे,बधिर तेलकट चकाकणारी त्वचा,त्वचेवर गाठी असणे,कानाच्या पाळ्या जाड होणे,भुवयांचे केस विरळ होणे,डोळे पुर्ण बंद न करता येणे इत्यादी लक्षणांची विचारणा व पाहणी या मोहीमेत करण्यात येणार आहे.
क्षयरोगाची लक्षणे – दोन आठवड्यापेक्षा ज्यास्त खोकला,दोन आठवड्यापेक्षा ज्यास्त ताप,वजनात लक्षणीय घट,थुंकीवाटे रक्त येणे,मानेवरील गाठ,भूक न लागणे व वजन कमी होणे इत्यादी लक्षणांची विचारणा व पाहणी या मोहीमेत करण्यात येणार आहे.