रात्रीची तपासणी भोवली, मत्स्य अधिकाऱ्याचा बोट अपघातात मृत्यू

0
10

वर्धा : रात्री मत्स्य साठा असलेल्या केजची पाहणी करण्यास गेलेले मत्स्य विभागाचे अधिकारी युवराज खेमचंद फिरके (रा.ठाणे, ह. मु. नागपूर) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले याच विभागाचे निरीक्षक सुनील भीमराव ठाकरे, नागपूर, विभागीय व्यवस्थापक बन्सी योगिराम गहाट (रा.औरंगाबाद ह.मू. नागपूर), मयंक विजयसिंह ठाकूर नागपूर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाने रा. बल्लारशहा हे सुखरूप बचावले आहे.

बोर धरण परिसरात ही घटना घडली. हे सर्व नागपूर विभागाचे अधिकारी रात्री मासळी पाहण्यासाठी बोटीने धरणाच्या पाण्यात गेले. परत येत असताना बोटीतून उतरताना पाचही पाण्यात पडले. दरम्यान त्यावेळी उपस्थित काहींनी सर्वांना पाण्याबाहेर काढले. मात्र मद्यधुंद असल्याने ते पुन्हा पाण्यात पडले. इतरांनी जवळच असलेला दोर पकडला. मात्र फिरके यांना वाचविण्यात अपयश आल्याचे सांगितल्या जाते.नागपूरचे अधिकारी नेहमीच या धरण परिसरात येत होते. रात्रीच मासळी पकडण्यास जायचे. दारूच्या पार्ट्या नेहमीच रंगत होत्या, अशी आता खुली चर्चा होत आहे. रात्री दहा वाजता तपासणी करण्याची काय गरज होती, अंधार पडण्यापूर्वी तपासणी करण्याची पद्धत आहे, ती का पाळली नाही, या परवानगीची तपासणी वरिष्ठांनी दिली होती का, लाईफ सेव्हींग जॅकेट का घातले नव्हते, असे प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहेत.