अजित पवारांच्या भाषणादरम्यान ‘प्रहार’ कार्यकर्त्यांचा गोंधळ

0
6

भंडारा : येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याने निषेध व्यक्त करीत प्रहार कार्यकर्ते मंचापुढे आले व ‘खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा सदस्य आहे. वसंत पडोळे असे त्याचे नाव आहे. सभास्थळी तो आंदोलन करण्याच्या तयारीनेच आला होता. त्याच्या सोबत आणखी कुणी होते का याचा शोध घेण्यात येत आहे.

पवारांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजीनंतर प्रहार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी अजित पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गोसीखुर्द प्रकल्पावरून भाजपनं अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. आता तेच लोक पवारांना सत्तेच्या खुर्चीवर घेऊन बसले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर एकप्रकारे अन्यायच झाल्याचे म्हटले.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाची अघोषित आणीबाणी असल्याचा आरोपही जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. एकीकडे सरकार म्हणते की आम्ही लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या दारी येऊन प्रश्न सोडवत आहोत आणि दुसरीकडे सरकारला कोणी प्रश्नच विचारायचे नाही म्हणून अघोषित आणीबाणी लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत आहेत, असे पवन वंजारी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस बंदोबस्त, सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.