जानेवारी महिन्यात महानाट्य व महासंस्कृती आयोजनाची मेजवानी

0
13

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली समिती

       गोंदिया, दि.3 : गोंदियाच्या सांस्कृतिक वैभवाला उंचीवर नेणाऱ्या दोन मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जिल्हावासियांना जानेवारी महिन्यात मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक महानाट्य व महासंस्कृती मेळाव्याचे आयोजन होत असून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे स्थळ व तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार येईल.

          जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे  व जिल्हा समन्वयक म्हणून उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील काम पाहणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य नागपूर संदीप शेंडे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम नरेंद्र लभाने, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग येसनसुरे, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी आनंद जैन, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, तहसीलदार समशेर पठाण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे हे समितीचे सदस्य असणार आहेत.

         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला संस्कृतीचे जतन, संवर्धन तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात लढवय्यांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे तसेच महानाट्याचे आयोजन जाहीर केले आहे.

         कला, साहित्य, संस्कृती क्षेत्रातील देश पातळीवरील विख्यात व्यक्तींचे सादरीकरण या सोबतच स्थानिक कलागुणांना वाव देण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीमत्वावर आधारित महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे. महानाट्य दोन किंवा तीन दिवसांचे तर महासंस्कृती मेळावा चार ते पाच दिवसांचा होणार आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे विविध समित्यांचे गठन केले आहे.

        आयोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यक्रम आयोजन, तांत्रिक मान्यता, वाहतूक, निमंत्रण व प्रसिद्धी विषयक समित्यांचा यात समावेश असणार आहे. यासंदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अधिकृतपणे कार्यक्रमांच्या तारखा व येणाऱ्या कलाकारांच्या संबंधीच्या माहितीची घोषणा होणार आहे.