सावित्रीबाई फुले यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आमदार:- मनोहर चंद्रिकापुरे

0
26

25 लाखाच्या दोन बांधकामाचे भूमिपूजन
अर्जुनी मोर. :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अपार कष्ट सोसून भारतातील स्त्रियांना शिक्षणाचे दार उघडून दिले .आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. ही सर्व किमया केवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरा मुळेच घडली. सावित्रीबाईं फुले यांनी महिलांना शिक्षित केले.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना समानतेचा दर्जा देऊन न्याय मिळवून दिला. त्यामुळे हे महापुरुष आपणासाठी आदर्शच आहेत. आज महिलांनी उमेद व ग्राम संघ तथा बचत गटाच्या माध्यमातून मोठी प्रगती केली आहे ही सर्व किमया केवळ सावित्रीबाई फुले मुळेच घडली. महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकृत करून सर्वत्र प्रगती करावी. कारण सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायीच आहेत असे विचार आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
3 जानेवारी रोजी तालुक्यातील सावरटोला/ बोरटोला येथे ग्राम संघाच्या महिला मंडळींनी आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार चंद्रिकापुरे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे होत्या. अतिथी म्हणून सरपंच युवराज तरोणे, उपसरपंच सुवर्णा तरोणे, ग्रामपंचायत सदस्य डॅनी डोये, धर्मेंद्र गजबे, दिलीप मेश्राम ,उर्मिला शिवणकर, कविता चचाने, सीमा शेंडे, शंकर तरोणे, योगेश लाडे, वामन राऊत, महादेव डोये, राजेंद्र तरोणे, पांडुरंग भोपे ,राधेश्याम तरोणे, नरेश खोब्रागडे् , पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, प्रशांत लाडे, तथा बचत गटाच्या महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. ग्रामपंचायत सावरटोला येथे आयोजित जयंती कार्यक्रम संकल्प समृद्धी ग्राम संघ स्फुर्ती महिला मंडळ सावरटोला यांच्या सौजन्याने घेण्यात आला. सर्वप्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून फुले दांपत्यांना अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून सावरटोला येथे आदिवासी उपाय योजनेअंतर्गत सभागृह बांधकाम व तांडा वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट नाली बांधकाम अशा दोन्ही मिळून 25 लाखाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी रचना गहाणे यांनीही सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकून आता महिला अबला राहिल्या नसून सबला झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी फार मोठी प्रगती केली आहे. सर्वच क्षेत्रात महिला अग्रसेर आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसायिक प्रगती करावी व आपले कुटुंब सक्षम करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सरपंच युवराज तरोणे, संचालन आशा सेविका निशाताई शिवणकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.