गोंदिया:- सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुप्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम यांचा अत्यंत मनोवेधक सत्कार करण्यात आला. सोबतच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.केशव सखाराम देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
विशेष असे की विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कविसंमेलन व विविधांगी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी उषाकिरण आत्राम होत्या. विद्यार्थ्यांनी वर्तमानाचा आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या अत्यंत मार्मिक कविता व गीत सादर करून कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. आदिवासी संस्कृतीत महिलांचे स्थान, भाषा आणि लोकसाहित्य यावर जीवनमित्र उषाकिरण आत्राम यांची प्रकट मुलाखत व डॉ. केशव देशमुख यांच्या शेतीमातीच्या कवितांबद्दलची चर्चा बहारदार ठरली.
मराठी विभाग प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उषाकिरण आत्राम आणि डॉ.केशव देशमुख यांच्या साहित्यावर अत्यंत कल्पकतेने भित्तिचित्र प्रदर्शन आयोजित करून दोघांनाही आश्चर्यकारक धक्का दिला. तर उषाकिरण आत्राम यांच्यावर विशेषांक काढण्यात आला. या प्रसंगी दोन्ही प्रतिभावंत लेखकांचा महावस्त्र, स्मृतिचिन्ह व ग्रंथ प्रदान करून सत्कार करण्यात आला. या जयंती कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते.