सकारात्मक पत्रकारितेतून विकास कार्याला बळ – पवनकुमार कछोट

0
8

– अकोला श्रमिक संघटनेचा पत्रकारदिन सोहळा; दिनदर्शिकेचे प्रकाशन व ओळखपत्राचे वितरण
अकोला : समाजातील उणिवांवर बोट ठेऊन त्या दूर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य पत्रकारांचे असते. पत्रकारांनी सकारात्मकतेला देखील प्रोत्साहित केल्यास विकास कार्याला बळ मिळेल, असे मत महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी आज येथे व्यक्त केले.
अकोला श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषक भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, तर जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर, ‘श्रमिक’चे अध्यक्ष प्रबोध देशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन आप्तुरकर, ज्येष्ठ पत्रकार मोहन बोरगावकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भोरे व दिनदर्शिकेसाठी सहकार्य करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज घडवत असतो. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण असते, असे डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी सांगितले. पत्रकारितेतून सत्य परिस्थिती समोर येणे गरजेचे असून पत्रकारांनी निरपेक्ष आणि निर्भिड पत्रकारिता करावी, असे मत हर्षवर्धन पवार यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांनी वृत्तपत्रांमधून निद्रिस्त समाजमनाला जागृत केल्याचे सांगून प्रास्ताविकात प्रबोध देशपांडे यांनी संघटनेच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रमिकचे सचिव विशाल बोरे यांनी, तर आभार कार्यकारिणी सदस्य करुणा भांडारकर यांनी मानले. यावेळी श्रमिकचे माजी अध्यक्ष अजय डांगे, उपाध्यक्ष दिलीप ब्राह्मणे, शरद पाचपोर, सहसचिव नीलेश जोशी, कोषाध्यक्ष प्रवीण ठाकरे, कार्यकारिणी सदस्य माणिक कांबळे, सुगत खाडे, अमोल नांदुरकर, पद्माकर आखरे, प्रमोद गावंडे, डॉ. शैलेंद्र दुबे, गोपाल हागे, डॉ. श्रीकांत उखळकर, श्रीकांत जोगळेकर, राजू चिमणकर, नीलम तिवारी, योगेश शिरसाट, दीपक अवताडे, रवि देशमुख, इम्रान खान, प्रवीण खेते, सदानंद दांदळे, कैलास टकोरे, संजय चक्रनारायण, शिवम पाथरकर आदींसह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रमिक पत्रकारांना विमा कवच

पत्रकारांची अत्यंत धावपळीची दिनचर्या असते. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोला श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सर्व सदस्यांसाठी दोन लाख रुपयांचा अपघात विमा नि:शुल्क काढण्यात आला. पत्रकारदिन सोहळ्यात विमा पॉलिसीचे सुद्धा वितरण करण्यात आले.