
अमरावती,7 जानेवारी- अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे शनिवार 6 जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या चार पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देविदास पवार व मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 11 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. पुरस्कार योजनेची प्रशंसा झाली.
श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे होते. भारतीय जैन संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन जैन (गांग), विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड, पुरस्कारांचे प्रायोजक मतदारचे संपादक अॅड. दिलीप एडतकर, हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, प्रतिदिन-वृत्त केसरीचे संपादक जयराम आहूजा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आयबीएनचे संजय शेंडे यांना प्रतिदिन-वृत्तकेसरी पुरस्कृत लक्षवेधी, दिव्य मराठीचे अनुप गाडगे यांना हिंदुस्थान पुरस्कृत बाळासाहेब व डॉ. अरुण मराठे प्रभावी, महाराष्ट्र टाईम्स व हिंदुस्थानचे शैलश धुंदी यांना विदर्भ मतदार पुरस्कृत ममता एडतकर उत्कृष्ट तर लोकमतचे गणेश वासनिक यांना जनमाध्यम पुरस्कृत अनिल कुचे शोध पत्रकारितेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कटियार यावेळी म्हणाले, पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनातल्या उणीवा कळतात व त्यातूनच कामाची दिशा प्राप्त होते. पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पोलिस आयुक्त डॉ. रेड्डी यांनी पत्रकाराच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. समाज व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त पवार यांनी नागरी समस्या सोडविण्यासाठी पत्रकरांच्या बातम्यांची सर्वाधिक मदत होते. पत्रकारांना सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. अन्य अतिथींची यावेळी भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणातून हरणे यांनी पत्रकार संघाच्या एकूण वाटचालीचा आलेख मांडतानाच पत्रकारांच्या समस्यांबाबत प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी दर्पणकारांना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. डॉ. नांदुरकर यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेची माहिती दिली. प्रास्ताविक व संचालन संघाचे सचिव रवींद्र लाखोडे यांनी केले. पुरस्कार वितरणाबाबतची मांडणी कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर यांनी केली. आभार कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे यांनी मानले. संघाचे माजी अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष अमोल इंगोले, कार्यकारिणी सदस्य संतोष तापकिरे, प्रदीप भाकरे, प्रवीण कपिले, महेश कथलकर, भय्या आवारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाला संघाचे माजी पदाधिकारी जितूभाई दोशी, देवदत्त कुळकर्णी यांच्यासह शहरातील सर्व पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते.
सुरेश शुक्ल यांना जीवनगौरव पुरस्कार
अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने यावर्षीपासून जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आला. सदर पुरस्कार स्व. सुमतीदेवी व डॉ. सोहनमल जैन, तख्तगड-राजस्थान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूरचे उद्योजक सुरेंद्र जैन यांनी पुरस्कृत केला आहे. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश शुक्ल यांना जाहीर करण्यात आला. 21 हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच हा पुरस्कार सन्मानपूर्वक त्यांना देण्यात येईल.





