‘चांदा ॲग्रो’ च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच उघडले कृषी विकासाचे नवे दालन

0
12

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना आणि प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन
खिचडीच्या विश्वविक्रमासह 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप
लकी ड्रा मधून पंढरी गोंडेला ट्रॅक्टर तर विशाल बारेकरला बुलेट
अंदाजे 60 हजार नागरिकांची कृषी महोत्सवाला भेट तर 25 हजार जणांची नोंदणी
पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप

चंद्रपूर दि.8जानेवारी : शेतकरी समृध्द आणि आत्मनिर्भर झाला तरच देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होईल, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात प्रथमच या माध्यमातून कृषी विकासाचे नवे दालन शेतक-यांना उपलब्ध झाले. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन, खिचडीचा विश्वविक्रम आणि शेतक-यांना 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटपाचे पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा रविवारी समारोप करण्यात आला.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. पाच दिवसीय या कृषी महोत्सवात दररोज किमान 12 ते 14 हजार याप्रमाणे अंदाजे 60 हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविली, तर 25 हजार जणांनी यात नोंदणी केली.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप : जिल्हा कृषी महोत्सवात नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून व्यक्तिश: 13 लाखांचे आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात प्रथम क्रमांकाचे मिनी ट्रॅक्टर विजेता कोरपना तालुक्यातील वडगाव खिराडी येथील पंढरी गोंडे तर द्वितीय क्रमांकाची बुलेट विजेता उर्जानगर येथील विशाल बारेकर ठरले. याव्यतिरिक्त तिस-या क्रमांकाचे पॉवर टिलर शेणगाव (ता. जिवती) येथील तुकाराम कपडे यांना, चवथ्या क्रमांकाचे पॅडी वीडर नंदोरी (ता. भद्रावती) येथील प्रशांत अहीरकर यांना तर पाचव्या क्रमांकाचे पावर वीडर आमडी (ता. बल्लारपूर) येथील सुभाष तेलतुंबडे यांना मिळाले. याशिवाय पाच विजेत्यांना चाप कटर, पाच विजेत्यांना भाजीपाला किट, 10 विजेत्यांना पॉवर स्प्रेअर, पाच जणांना आटा चक्की अशी बक्षीसे देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांचासुध्दा सन्मान करण्यात आला. प्रथमच लकी ड्रॉ च्या माध्यमातून शेतक-यांना आकर्षक बक्षीसे मिळाल्याने शेतक-यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

7000 किलो पेक्षा अधिक खिचडीचा विश्वविक्रम* : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथील कृषी महोत्सवात 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. ही खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. तसेच कृषी प्रदर्शनाच्यास्थळी विविध स्टॉलवर असलेल्या प्रत्येक माणसाला आणि शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल, अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली.

बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते अभियानाचा शुभारंभ: जिल्हा कृषी महोत्सवात ‘बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात 5001 कि.मी. चे शेतपाणंद रस्ते तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मातीकाम पूर्ण झालेले 2055 कि.मी. चे रस्ते, मातीकाम सुरू असलेले 405 कि.मी. चे रस्ते आणि नव्याने प्रस्तावित 3182 कि.मी.चे मुरमीकरणाचे शेतपाणंद रस्ते आणि मुरमीकरण झालेले परंतु खडीकरण बाकी असलेले इतर रस्ते सुरू करण्यात येतील.

मिशन जयकिसान अभियानाचा शुभारंभ : कृषी क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा एक मॉडेल बनावा, या भागातील शेतकरी संपन्न व्हावा, शेतीसह कृषीपूरक उद्योगाला जिल्ह्यात चालना मिळावी आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषीवैशिट्य असलेली गावे विकसित व्हावी, या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘ मिशन जय किसान’ अभियानाचा कृषी महोत्सवात शुभारंभ करण्यात आला.

31 कोटी 90 लक्ष रुपयांच्या भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता : ऐकार्जुना (ता. वरोरा) येथे 25 हेक्टर जमिनीवर 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन कार्यक्रमात संशोधन केंद्राला मान्यता देण्यात आल्याचा आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपूर्द केला.

पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी: पाच दिवस चाललेल्या कृषी महोत्सवात कृषी विषयक विविध चर्चासत्रे, परिसंवाद यांच्यासोबतच विविधि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणली. सोबतच या कृषी महोत्सवात जवळपास विविध विभागाने 350 स्टॉल लावले होते.