गोंदिया, दि.14 : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त वतीने जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्राचे आयोजन 14 जानेवारी 2024 रोजी मोदी मैदान, बालाघाट टी पॉईंट जवळ, गोंदिया येथे करण्यात आले होते.
गोंदिया जिल्ह्यात पारंपारिक भात पिकाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र वाढावे या दृष्टिकोनातून सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राला उद्घाटक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्रकल्प संचालक आत्मा अजित अडसुळे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. सय्यद शाकीर अली वरिष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र गोंदिया, डॉ. तेजेश्वरी टेंभरे प्राध्यापिका एस. एस. गर्ल्स कॉलेज, डॉ. प्राजक्ता डोंगरवार आहारतज्ञ सहयोग रुग्णालय गोंदिया, डॉ. ईश्वरी खटवानी प्राध्यापक एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पौष्टिक तृणधान्याच्या लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यामागे काय उद्दिष्टे आहेत व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य संकल्पना काय आहे याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. सय्यद शाकीर अली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात पिकाला पर्याय म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी, कसे फायदेशीर आहे व त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. तेजेश्वरी टेंभरे यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी इत्यादी धान्यांपासून चविष्ट व सकस पदार्थ कसे तयार करावेत याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित डॉ. प्राजक्ता डोंगरवार आहारतज्ञ सहयोग रुग्णालय गोंदिया यांनी उपस्थित महिला व पुरुष शेतकऱ्यांना दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे का गरजेचे आहे व मानवी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई यांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी पवन मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मंडळ कृषी अधिकारी सालेकसा नंदू वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सल्लागार भारत गोंडाने, नूतन कटरे, रिजवान शेख, अनिता उके, कुंजलता भुरकुटे, पुष्पा कावरे, महेंद्र दिहारे, नरेश हरीणखेडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.