सिमेंट,लोहा,रेतीचे दर गगनाला; मग अल्पशा अनुदानात घर कसे साकारायचे : विश्वरत्न रामटेके 

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.14- मोदी आवास घरकुल योजना, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो पण साहित्याचे दर वाढल्याने घरकुलाचे बांधकाम करणे अडचणीचे होत आहे. सिमेंटची बॅग ३३०, रेतीसाठी सात हजार तर लोहाही महागल्याने घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करताना लाभार्थ्यांची दमछाक होत आहे. ग्रामीण भागात गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येत आहे. घरकुलाचे मंजूर केलेले अल्प निधी संपूर्ण बांधकामासाठी आहे. १ लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान ग्रामीण भागात बांधकामासाठी मंजूर करण्यात येत आहेत. घरकुलाचे बांधकाम करताना लाभार्थी कर्जबाजारी होत आहे. लाभार्थी हप्ते कर्जफेड करताना संपूर्ण आयुष्य निघून जात आहे. ग्रामीण भागात सिमेंट, लोहा, विटा, मजूर व मजुरी आदी साहित्यांचे दर महागले आहेत. सर्वत्र साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करणे कठीण होत आहे. घरकुल निधीत वाढ करण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वरत्न रामटेके यांनी केली आहे. अनेक लाभार्थ्यांना पदरमोड करावी लागत असल्याचे चित्र आहे. बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, घरकुलाच्या अनुदानात अद्यापही वाढ करण्यात आली नाही. तर अनेक लाभार्थ्याचे घरकुलाचे हप्ते थकले असल्याने त्यांना उधार उसनवारी करून तडजोड करावी लागत आहे. त्यामुळे घरकुलाचे स्वप्न साकारताना आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते विश्वरत्न रामटेके यांनी केली आहे.