गोंदिया (दि.15 जानेवारी ): कृषी विभागामार्फत गोंदिया जिल्हा कृषी व पौष्टीक तृणधान्य महोत्सव “मोदी मैदान”, बालाघाट रोड, टी पॉईंट जवळ गोंदिया येथे दि. 13 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केले आहे. कृषी महोत्सव दरम्यान आरोग्य विभागामार्फत आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नागरिकांनी काढुन घेण्याबाबत जनजागृती वर भर देण्यात येत आहे. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड हे दोन्ही कार्ड वेगवेगळे असुन आयुष्मान कार्ड मुळे 5 लाखापर्यंत विमा संरक्षण मोफत मिळणार आहे तर आभा कार्ड मुळे एक प्रकारे तुमच्या आरोग्यासंबंधीच्या वैद्यकिय ईतिहास माहितीचं खातं असेल. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असेल.
कृषी महोत्सव दरम्यान आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आलेल्या स्टॉल मध्ये आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत विशेष जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र स्टॉल कार्यान्वित केला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे. त्यासाठी आरोग्यमित्र कोनिका भुते, रिना ठाकरे, अमोल बोहरे मंगला मांढरे, अर्चना नेवारे हे भेट देण्यात येत असलेल्या लोकांचे आयुष्मान कार्ड काढण्याबाबत ई-के.वाय.सी करण्यात येत आहे. जिल्हा प्रधानमंत्री आयुष्मान योजनेचे समन्वयक डॉ. जयंती पटले व त्यांचे पथकामार्फत या योजनेचे महत्व लोकांना पटवुन देण्यात येत आहे.
आयुष्मान कार्ड – आयुष्मान भारत योजनेंतर्गत शासनाने 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आयुष्मान कार्ड तयार करणे अनिवार्य आहे. शासनाने आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवल्याने गोरगरिबांना आरोग्यविषयक उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 1356 आजारांवर आता मोफत उपचार मिळणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान आयुष्मान योजनेचे एकत्रीकरण करुन या योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा नागरिकांना मिळणार असल्याने लोकांनी आपले आजाराचे कवच गोल्डन कार्ड म्हणजेच आयुष्मान कार्ड काढुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी हे 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणनेच्या आधारावर असून या यादीत नाव असणारा व्यक्ती या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. भविष्यात आजार होवुन उपचारासाठी बिकट आपत्ती उदभवु नये यासाठी आजच आयुष्मान कार्ड काढुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.हे कार्ड सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायतीचे सेतु केंद्र, या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालय व सद्य स्थितीत आरोग्य विभागामार्फत ई-के.वाय.सी. द्वारे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
आभा कार्ड – आयुष्मान भारत डिजीटल मिशन (ABHA) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड 2022 (आभा) हा उपक्रम सुरु केला आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सर्व आरोग्य संस्था डिजिटल स्वरूपात पोहोचविण्याकरता जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (आभा) हेल्थ आयडी कार्ड काढण्यात येत आहेत. नागरीकांच्या आरोग्याची माहिती एकत्रित मिळवण्यासाठी आणि त्यांना आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी सर्वांनी हे कार्ड काढावे.
डिजिटल कार्डचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, याच्या वापराला सुरुवात झाल्यास तुम्हाला डॉक्टरकडे जुन्या चिठ्ठ्या कागदपत्रं घेऊन जावी लागणार नाहीत.जुन्या चाचण्यांचे रिपोर्ट नसतील तर डॉक्टर पुन्हा सगळ्या चाचण्या करायला लावणार नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. तुम्ही कोणत्याही शहरात उपचार केले, तरी डॉक्टर युनिक आयडीच्या माध्यमातून तुमची आरोग्यासंबंधीची जुनी माहिती पाहू शकेल. हा हेल्थ आयडी नि:शुल्क असून प्रत्येकानं याचा वापर करावा यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.
डिजिटल हेल्थ या कार्डवर तुम्हाला 14 अंकी क्रमांक मिळेल. त्या नंबरद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तिला ओळखलं जाईल. त्या माध्यमातून कोणत्याही रुग्णाची मेडिकल हिस्ट्री (पूर्वीच्या आजारांची माहिती) उपलब्ध होईल.
हे कार्ड म्हणजे एक प्रकारे तुमच्या आरोग्यासंबंधीच्या माहितीचं खातं असेल. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असेल.
यापूर्वी कोणत्या आजारावर उपचार झाले, कोणत्या रुग्णालयात झाले, कोणत्या चाचण्या करण्यात आल्या, कोणती औषधं दिली, रुग्णाला नेमके कोणते आजार आहे आणि रुग्ण एखाद्या आरोग्य योजनेशी संलग्न आहे का? इत्यादीचा त्यात समावेश असेल.
आयुष्मान कार्ड व आभा कार्ड हे दोन्ही कार्ड वेगवेगळे असुन आयुष्मान कार्ड मुळे 5 लाखापर्यंत मोफत विमा संरक्षण मिळणार आहे. 1356 आजारांवर आता शासनामार्फत निवड केलेले अंगिकृत दवाखान्यात मोफत उपचार मिळणार आहे. आता लाभार्थी स्वता आपल्या मोबाईलवर आयुष्मान अँप डाऊनलोड करुन आयुष्मान कार्ड काढु शकत आहे. आभा कार्ड मुळे एक प्रकारे तुमच्या आरोग्यासंबंधीच्या वैद्यकिय ईतिहास माहितीचं खातं असेल. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असणार आहे. तरी दोन्ही कार्ड काढुन शासनाच्या आरोग्य योजनांचा फायदा घेण्यात यावा.अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य संस्थेतील वैद्यकिय अधिकारी किंवा आपल्या गावातील आशा सेविका यांच्याशी संपर्क साधावा.
– डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी