गोंदिया, दि.15 : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा कृषि व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन 13 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 पर्यंत मोदी मैदान, बालाघाट टी पाईंट जवळ, गोंदिया येथे करण्यात आलेले आहे.
वर्ष 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्यामुळे महोत्सवात यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरीचे महत्व जाणून घेतले व गोंदिया शहरातील जनतेने ज्वारी, बाजरी व इतर वस्तुंच्या खरेदीवर विशेष भर दिल्यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झालेली आहे. त्यामुळे विक्रेते शेतकरी व महिला बचत गटांना भरपूर आर्थिक फायदा झालेला आहे.
या कृषि महोत्सवात दालन क्र.1 मध्ये कृषि विभाग, आत्मा, मत्स्य विभाग, वन विभाग, रेशीम विभाग, आरोग्य विभाग इत्यादी विभागांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. दालन क्र.2 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित बचत गटांच्या स्टॉलच्या माध्यमातून मिरची पावडर, हळद पावडर, मसाले पावडर, पापड, लोणचे इत्यादी गृह उपयोगी वस्तुंची विक्री करण्यात येत आहे. तसेच महिलांद्वारे उत्पादित व तयार करण्यात आलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. दालन क्र.3 मध्ये विविध कंपन्यांचे बियाणे, किटकनाशके, पुस्तके इत्यादी शेती उपयोगी वस्तुंचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. दालन बाहेरील आवारात शेती उपयोगी औजारे, ट्रॅक्टर, थ्रेशर, बॅटरीवर चालणारे वाहन व सौर उर्जेवरील पंपचे स्टॉल नागरिकांना व शेतकऱ्यांना आकर्षिक करीत आहेत. या महोत्सवास भेट देणाऱ्या सर्व शेतकरी व नागरिकांसाठी पौष्टिक तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्य पदार्थांची विक्री महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेदच्या महिला बचत गटाद्वारे करण्यात येत आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकरीता मशरुम लागवड तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीळसंक्रांत व रविवारची सुट्टी एकत्र आल्यामुळे महोत्सवामध्ये गोंदिया शहर, गोंदिया व जिल्ह्याबाहेरील तसेच लगतच्या बालाघाट जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.
आत्मा, कृषि विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त वतीने आयोजित कृषि महोत्सवाचा शेतकऱ्यांनी व जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण व माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी केले आहे.