नक्षलग्रस्त गर्देवाडात २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र

0
7

गडचिरोली: नक्षल्यांच्या बिमोडासाठी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे १५ जानेवारीला अवघ्या २४ तासांत पोलीस मदत केंद्र उभारुन आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. तब्बल एक हजार सी- ६० जवान, ५०० अधिकारी- कर्मचाऱ्यांसह १० जेसीबी, १० ट्रेलर, ०४ पोकलेन, ४५ ट्रकच्या सहाय्याने हे केंद्र स्थापन करण्यात आले.हेडरी उपविभागअंतर्गत गर्देवाडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना गरजेची होती. आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका निर्भय व निकोप वातावरणात पार पडाव्यात तसेच या भागातील नागरिकांच्या सर्वागिण सुरक्षा व विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलिसांचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.यावेळी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी स्थानिकांना सलवार सूट, नववारी साडी, पुरुषांना घोतर, युवकांना लोअर पॅन्ट टी-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, मुलींना फ्रॉक, सायकल, नोटबुक, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलिबॉल साहित्याचे वाटप करण्यात आले. उपमहानिरिक्षक संदीप पाटील , केंद्रीय राखीव बलाचे उपमहानिरिक्षक जगदीश मीणा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर अधीक्षक कुमार चिंता , यतीश देशमुख , एम. रमेश , उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस , गर्दैवाडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी व सहायक निरीक्षक बाळासाहेब जाधव उपस्थित होते.

पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा उपलब्ध असेल. २० पोर्टा केबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०४ अधिकारी व ५५ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप ११, डी कंपणी नवी मुंबईचे ०२ प्लाटुन तसेच सीआरपीएफ १९१ बटा. डी कंपणीचे ०१ असिस्टंट कमांडन्ट ७५ अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.