‘जाणता राजा’ महानाट्यातून शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचे दर्शन

0
8

* २३ जानेवारी पर्यंत आयोजन

* रोज सायंकाळी ६ ते ९ प्रयोग

* सर्वांसाठी प्रवेश नि:शुल्क

* इंदिरा गांधी स्टेडियमवर अवतरला शिवकालीन इतिहास

गोंदिया, दि.22 : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व तेजस्वी व्यक्तीमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘‘जाणता राजा’’ महानाट्याला गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचे दर्शन गोंदियाकरांना होत आहे, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन व गोंदिया जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘‘जाणता राजा’’ या महानाट्याचा रविवार २१ जानेवारी रोजी स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे श्री. अग्रवाल यांचे हस्ते भव्य शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे अध्यक्ष पंकज रहांगडाले, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, माजी आमदार डॉ.परिणय फुके, केशवराव मानकर, पं.स.सभापती मुनेश्वर रहांगडाले यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थित होती.

विनोद अग्रवाल म्हणाले, ‘‘जाणता राजा’’ हे नाट्यप्रयोग संपुर्ण महाराष्ट्रात अजरामर असून हे महानाट्य गोंदियात सादर होत आहे, ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. शिवाजी महाराजांनी जनतेकरीता-रयतेकरीता कुशल काम केले. शिस्तबध्द लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले, या नाट्यप्रयोगातून शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याचे कुशल कार्य माहिती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांना यामध्ये आवर्जुन सहभागी करावे. मराठी भाषेला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निखिल पिंगळे म्हणाले, शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत, याचा मला अभिमान वाटत आहे. आता राज्य हे कायद्याचे राज्य आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामुळे आम्हाला बळ मिळते. इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला संपुर्ण महाराष्ट्रात अजरामर असलेला ‘‘जाणता राजा’’ नाट्यप्रयोग गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर होत आहे, ही गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.

डॉ. परिणय फुके म्हणाले, ‘‘जाणता राजा’’ महानाट्याची संकल्पना बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडली. शिवरायांचा इतिहास या नाट्यप्रयोगातून पहायला मिळत आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांची गौरव गाथा नागरिकांना पहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी या नाट्यप्रयोगात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातुन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले की, 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आणि 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील हा प्रयोग गोंदिया येथे होत आहे. शिवरायांचे कुशल कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवियासाठी ‘‘जाणता राजा’’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगाचा गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी भरपुर आस्वाद घेऊन मनोमन दाद द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोंदिया भाऊराव उके, पं.स.उपसभापती गोरेगाव राजकुमार यादव, न.प.मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, भाऊराव उके यांचेसह जिल्ह्यातील कला रसिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले.