जि.प.बांधकाम व आरोग्य विभागाला राजशिष्टाचाराचा विसर

0
19

राज्यउपमंत्र्याच्या दर्जा प्राप्त जि.प.अध्यक्षाला केले अतिथी

गोंदिया,दि.25ः गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या नवनिर्मित इमारतीचा लोकार्पण सोहळा व जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लोकार्पण सोहळा आज 25 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका तयार करतांना मात्र दोन्ही विभागाने राजशिष्टाचाराला ठेंगा दाखवल्याचे निदर्शनास आले.राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उदघाटक असतील तर राज्य उपमंत्र्याचा दर्जा प्राप्त असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असायला पाहिजे.मात्र वरील दोन्ही कार्यक्रमाच्या लोकार्पण पत्रिकेत उदघाटक म्हणून पालकमंत्री यांचे नाव टाकण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सहअध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदार व लोकसभा खासदारांचे नाव घालत जिल्हा परिषद अध्यक्षांना मात्र मुख्य अतिथी ठेवल्याचे दिसून आले.खासदार व आमदारापेक्षाही जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्थान हे मोठे असताना त्याकडे कार्यकारी अभियंता बांधकाम व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केलेले दुर्लक्ष हे जाणिवपुर्वक केल्याचे दिसून येत आहे.पत्रिकेत राजशिष्टाचाराला मान देता नियोजन संबधित विभागाने केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनीच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आपल्या कार्यालयात हजर राहून जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले.विशेष म्हणजे पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या इमारत बांधकामाच्या इलेक्ट्रिक व इतर साहित्याकरीता जिल्हा निधीतून विशेष निधी मंजूर करुन इमारत पुर्ण करण्याकरीता अध्यक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने व जिल्हा आरोग्य अधिकार्याने ही जाणीवपुर्वक केली की कुणी करवून घेतली यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.