कार्यकर्ते अशोक शेंडे यांनी सांगितले संघटना उभी करण्याचे मूलमंत्र

0
3

गोंदिया– अन्न, वस्त्र,निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.याशिवाय शिक्षण व आरोग्य सुद्धा मूलभूत गरजा आहेत. या गराजांपासून आपला मासेमारी करणारा ढिवर समाज अजूनही वंचित आहे.अशा वंचितांची दखल घेऊन त्यांना सहकार्य व मार्गदर्शन केल्यास सामाजिक संघटना सहज उभी राहू शकते. सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे असे आवाहन अखिल ढिवर विकास समितीचे कार्यकर्ते अशोक शेंडे, साकोली यांनी केले.
शास्त्री वॉर्ड गोंदिया येथील माणिक गेडाम यांच्या निवासस्थानी गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या नुकत्याच (ता.22) झालेल्या सभेला प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सुंदरलाल लिल्हारे तर मुख्य संयोजक परेश दुरुगवार आणि मनिराम मौजे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक शेंडे पुढे म्हणाले की घरकुलादी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभ वंचितांना मिळवून दिल्यास ते मनाने जोडल्या जातील. आर्थिक बळ उभारण्यासाठी स्व. जतिरामजी बर्वे यांच्या नावाने बचत गट सुरू करावे. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक कुटुंबात विश्वास निर्माण करण्याचे व संघटन शक्ती मजबूत करण्याचे हे मूलमंत्र असल्याचे ते म्हणाले.
कार्यकर्ते परेश दुरुगवार यांनी भारत सरकारच्या दस्तऐवजात दडलेली ऐतिहासिक माहिती उजागर करताना सांगितले की सन 1936 ते 1950 पर्यंत भंडारा-गोंदिया जिल्ह्यतील ढिवर समाज हा अनुसूचित जातीत (एस.सी.) होता. तो पूर्ववत करावा या मागणीसाठी आपल्या समितीने पुराव्यांसह महाराष्ट्र शासन, अनुसूचित जाती/जमाती आयोग ते केंद्र शासनाच्या अनुसूचित जाती/जमाती पर्यंत कागदपत्रे सादर केल्याची माहिती दिली. तर मनिराम मौजे यांनी समाज प्रबोधनासाठी दोन्ही जिल्ह्यांचा संयुक्त मेळावा लवकरात लवकर घेण्याचा मानस व्यक्त केला. देवीलाल केवट, हौसलाल वलथरे, गणराज नान्हे, कोमेश कांबळे, दिगंबर नगरे, मनोहर मौजे, भाऊलाल तुमसरे, नंदकिशोर उके, जियालाल मोरदेवें यांनी मेळाव्यासंबंधी नियोजन तातडीने करण्याचा आग्रह केला. प्रारंभी माणिक गेडाम यांनी प्रस्तावना, मनोज मेश्राम यांनी संचालन व शेवटी आभार व्यक्त केले. सभेच्या आयोजनासाठी आशिक मोरदेवें, संजय कांबळे, किसन मेश्राम, सुखलाल उके, रवींद्र देवगडे, ऋषी गेडाम यांनी परिश्रम घेतले.